कथाबोध : सत्य कसे सांगावे?   

डॉ. न. म. जोशी 

एक बलाढ्य राजा होता. त्याच्या दरबारी अनेक विद्वान होते. आपापल्या क्षेत्रात कार्यकुशल असणारे मंत्रीही होते. राजाला राज्यकारभाराची चांगली जाण होती. शिवाय त्याला साहित्याची आवडही होती. राजा स्वतः कविता करीत असे. दरबारची कामे संपली की, राजा सर्व दरबारी लोकांना आपल्या कविता ऐकवत असे. त्या कविता मुळीच चांगल्या नव्हत्या. राजा हौस म्हणून कविता करीत होता. आता राजा स्वतःलाही मोठा कवी मानायला लागला होता. दरबारी लोकांना त्या सक्तीनं ऐकाव्या लागत होत्या. पण करणार काय? राजाला कोण सांगणार?

एकदा एक ख्यातनाम काश्‍मिरी कवी त्या राजाच्या राज्यात आले होते. राजाला वाटलं, त्या ख्यातनाम कवीला आपल्या दरबारी निमंत्रित करून त्यांचा सन्मान करावा आणि आपल्याही कविता त्यांना ऐकवाव्यात. खरं तर राजानं आपल्या कविता ऐकवण्यासाठी त्यांच्या सन्मानाची योजना केली होती. काश्‍मिरी कवी आले. दरबार भरला. राजानं काश्‍मिरी कवींचा सन्मान केला. मग आधी त्यांच्या कविता त्यांनी ऐकवल्या. काश्‍मिरी कवींच्या कविता खरोखरीच खूप छान होत्या. सगळे दरबारी त्या पाहुण्या कवींच्या कविता ऐकून खूष झाले. मग राजेसाहेब उठले.

आता राजेसाहेबांच्या रद्दी कविता ऐकाव्या लागणार याबद्दल दरबारी लोकांची नाराजी होती. पण बोलण्याची सोय नव्हती. राजेसाहेबांनी एकेक कविता ऐकवायला सुरुवात केली. दरबारी मारून-मुटकन कविता ऐकत होते. काश्‍मिरी पंडितही कविता ऐकत होते. राजाचं कवितावाचन संपलं. मग राजानं काश्‍मिरी कवीला विचारलं, “कशा वाटल्या माझ्या कविता?”
आता काश्‍मिरी पंडित राजाची खोटी स्तुती करणार की खरं सांगणार असा प्रश्‍न होता. काश्‍मिरी कवी शांतपणे म्हणाले, “महाराज आपण एक पराक्रमी, विद्वान सत्ताधीश आहात. आपण काहीही करू शकता. आज आपण मनात आणलेलं दिसतंय की, अत्यंत नीरस आणि क्‍लिष्ट काव्य करायचं. ते आपल्याला छान जमलंय. अभिनंदन!’ राजा काय समाजाचं ते समजला. काश्‍मिरी कवीनं चतुराईनं सत्य सांगितलं होतं.

कथाबोध :
कधी कधी परखडपणे सत्य सांगणं अवघड जातं. पण त्यासाठी असत्य बोलावंच लागतं, असं नाही. चातुर्य असेल तर अप्रिय सत्यही सांगता येतं. सत्य सांगायची कला अवगत केली की, समोरच्याला नाखूष न करता सत्य सांगता येतं.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)