#कथाबोध : वेगळी गुरूवंदना! 

डॉ. न. म. जोशी 

पुण्याला लक्ष्मी रस्त्यावर कॉमनवेल्थसमोर ओकवाडा आहे. यातील एका घरंदाज आणि एकत्र कुटुंब पद्धतीच्या घरात एक मुलगी जन्माला आली वडील गायक, आई कलाप्रेमी. गवयाचं पोर सुरात रडत तशी ही मुलगी रडायची सुद्धा सुरात. आणि ती रडताना तिला थांबवण्यासाठी तिचे वसंतराव तबल्यावर ठेका धरायचे. मग हिचं रडं थांबायचं.
मुलगी मोठी झाली. शाळा, कॉलेजात जाऊ लागली. पण तिचे सारं लक्ष सूर आणि गाणं याकडेच असायचं. ही गायची. वडील हार्मोनियमवर साथ करायचे. हळूहळू गळ्यातला सूर फुलला आणि ती संगीताच्या कार्यक्रमात गाऊ लागली. रसिकांनी दाद दिली तरी आपला सूर पक्का व्हायला हवा म्हणून प्रख्यात संगीत दिग्दर्शक आणि गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडे गाणं शिकू लागली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंडितजींनी तिला आपल्या कार्यक्रमात आपल्याबरोबर काही कार्यक्रमात गाण्याची संधी दिली आणि अर्थातच तिला रसिकांची दाद मिळू लागली. ती प्रयोगशील गायिका म्हणून आकाराला येऊ लागली. शास्त्रीय, उपशास्त्रीय, लोकरगीत, गझल यामध्ये तिने अनेक प्रयोग केले. आणि मग तिच्या मनात आलं आपल्या गुरुजींनी पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्याला जी शिकवण दिली त्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्‍त केली पाहिजे.

कृतज्ञता व्यक्‍त करण्याचे अनेक मार्ग असतात. कुणी भरघोस गुरुदक्षिणा देऊन गुरुबद्दल आदर व्यक्‍त करतात. कुणी त्यांना घरी बोलावून किंवा जाहीर समारंभात गुरूपूजन करतात. कुणी त्यांच्याबद्दल लेख लिहितात.. असं बरंच काही करतात.

या मुलीने ठरवलं… आपण आगळीवेगळी गुरूवंदना सादर करून कृतज्ञता व्यक्‍त करायची. मग तिनं पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी गायिलेली आणि संगीत दिग्दर्शन केलेली चित्रपटातील गीत, भावगीत, अभंग या साऱ्यातून 150 गाणी निवडली.

वादकांचा आणि सहगायकांचा उत्तम संच जमवला. उत्तम निवेदकांना आमंत्रित केलं आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी आठ ते रात्री साडेबारापर्यंत हृदयनाथांची सगळी गाणी एकेक करीत सादर केली. दर दोन तासांनी फक्‍त 15 मिनिटे ब्रेक! रवींद्र खरे यांनी प्रभावी निवेदन करून कार्यक्रमात रंगत आणली.
रात्री नऊ वाजता स्वत: गुरुवर्य पं. हृदयनाथांनी नाट्यगृहात प्रवेश केला तेव्हा संपूर्ण नाट्यगृहात स्वरशब्दांची धुंद लयकारी निर्माण झालेली त्यांनी पाहिली. त्यांच्या शिष्येने ही आगळीवेगळी गुरूवंदना सादर केली होती. पं. हृदयनाथांची ही शिष्या म्हणजे सुरेल गायिका मंजुश्री ओक.

कथा बोध 
गुरुदक्षिणा ही केवळ पैशात देता येते असं नाही. गुरूंचा शिकवणीचा वारसा पुढे चालवून ती शिकवण समाजापर्यंत नेणं हीसुद्धा गुरूदक्षिणा आणि गुरूवंदना आहे. अशा प्रकारे एक नवा आदर्श घालून देत या गुरू-शिष्य जोडीने समाजाला एक उदाहरण घालून दिले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)