#कथाबोध: विंचू चावला… 

डॉ. न. म. जोशी 
यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. भारताचे संरक्षणमंत्री होते. राजकारणात असले तरी साहित्य, संस्कृती, कला, नाट्य, याबाबत त्यांची रसिकता सर्वमान्य होती. कार्य निष्ठा हा त्यांचा एक विशेष गुण होता.
स्वातंत्र्यपूर्व काळातही गोष्ट आहे. एकदा यशवंतराव चव्हाणसाहेब नेहमीप्रमाणे अशाच एका दौऱ्यावर होते. दौरा त्यांच्या आवडत्या कराड भागात होता. वैद्य कासेगावकर हे त्यांचे स्नेही, काही वेळा त्यांच्याबरोबर असत. तसे ते या दौऱ्यात होते. कराड, विटे, आसेगाव, असा प्रचार दौरा ठरला होता. त्याकाळी आतासारखे चांगले रस्तेही नव्हते. कडाक्‍याचं ऊन होतं. सकाळपासून निरनिराळ्या गावी यशवंतरावांच्या सभा सुरू होत्या.
एका गावात दुपारी जेवणानंतर त्यांना थोडीसी विश्रांतीची सोय केली होती. तंबू घातला होता. नंतर लगेच पुढील गावी दौऱ्यावर जायचं होतं. दोन वाजता जेवणं झाली. कार्यकर्त्यांनी यशवंतरावांना तंबूत नेलं. आसपास कुठंच चांगली इमारत नव्हती म्हणून तंबूची सोय केली होती. यशवंतरावांनी अंग टाकलं. आणि त्यांचा डोळा लागला. चार-पाच ठिकाणी व्याख्यान देऊन थोडी थकावट आली होती. थोडे वेळ विश्रांती आवश्‍यक होती. लगेच पुढच्या गावी शेकडो लोक त्यांच्या सभेसाठी थांबलेलेच होते.
तंबूच्या कनातीखालून एक मोठा विंचू आला आणि यशवंतरावांच्या पायाला डसला. त्या डंखानं यशवंतराव जागे झाले पण ओरडले नाहीत. विंचू तर नांगी मारून केव्हाच तंबूच्या दुसऱ्या टोकातून पसार झाला होता.
कार्यकर्ते आत आले आणि बघतात तर यशवंतरावांचा पाय काहीसा सुजलेला. कार्यकर्त्यांनी त्वरित वैद्य कासेगावकर यांना बोलावलं. त्यांनी उताऱ्याचं औषध दिलं. पण ते लागू पडायला आणि बरं वाटायला तास-दोन तास तर सहज जाणार! पुढील दौरा रद्द करावा असं कार्यकर्त्यांनी सुचवलं. यशवंतरावांना खूप वेदना होत होत्या. पण तरीही ते म्हणाले, “भर उन्हात पुढील गावात माझ्यासाठी हजारो लोक थांबलेले असतील. मी जाणारच.’
“पण साहेब आपल्याला विंचू चावलायं.’
“हो, विंचवानं त्याचं काम उत्तम केलंय. आता मीही माझं काम उत्तम करतो,’ असं म्हणून वेदना सोसत यशवंतराव दौऱ्यावर पुढे निघाले.
कथाबोध 
समाजकार्यात असणाऱ्या व्यक्‍तींनं स्वतःवर आलेली संकटे धैर्याने व सहनशीलतेने पचवून लोकांच्या दुःखाचा विचार करावा. स्वतःच्या समस्येपेक्षा लोक भावनेला अधिक महत्त्व द्यावे. लोक भावनेचा आदर करण्यासाठी नेहमी सिद्ध असावे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)