कथाबोध: यशाचा मार्ग 

डॉ. न. म. जोशी 

सॉक्रेटिस एक महान तत्त्वज्ञ होते. छोट्या छोट्या गोष्टींबाबतही त्यांचा विचार काहीतरी वेगळा असे. त्याला तत्त्वज्ञानाची बैठक असे. सॉक्रेटिस यांच्याकडे सल्लामसलतीसाठी किंवा विचारविनिमयासाठी अनेकदा बरेच लोक येत असत. सॉक्रेटिस प्रत्येकाला मार्गदर्शन करीत असे. एकदा असाच एक तरुण मुलगा आला. त्यांने सॉक्रिटीसला वंदन केलं. नंतर त्यानं विनम्रपणे विचारलं,

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“सॉक्रेटिस महाराज, यश मिळविण्यासाठी माणसानं नेमकं काय करावं? कसं वागावं?’
“याचं उत्तर मी तुला उद्या देईन. उद्या सकाळी ये,’ सॉक्रेटिस म्हणाले.
दुसऱ्या दिवशी सकाळी सॉक्रेटिस त्या तरुणाला घेऊन नदीवर गेले. नदीचं पात्र अथांग भरलेलं होतं. त्या तरुणाला घेऊन सॉक्रेटिस नदीच्या पाण्यात पुढं पुढं जाऊ लागले.
“अजून किती पुढं जायचं आहे?’ त्या तरुणानं अधिरपणानं विचारलं.
“मी नेईन तितकं. मी आहे ना तुझ्याबरोबर. मग कसली चिंता?’ सॉक्रेटिस म्हणाले.
सॉक्रेटिस आणि तो तरुण पुढं पुढं जातच राहिले. पाणी आता गळ्याच्या खाली खांद्यापर्यंत आलं. मग सॉक्रेटिस यांनी एकदम त्या तरुणाचं डोकं धरलं. त्याचे केस धरून त्याचं मुंडकं पाण्यात बुडवलं.
त्या तरुणाला श्‍वास घेता येईना; अगदी नाका-तोंडात पाणी जाऊ लागलं. तेव्हा त्यानं सॉक्रेटिसच्या हाताला जोराचा धक्का मारला, सर्व शक्ती एकवटून त्यानं डोकं वर काढलं आणि श्‍वास घेतला तेव्हा त्याला बरं वाटलं.
मग दोघेही परत सॉक्रेटिसच्या घरी आले.
तरुणांन अंग-डोकं पुसलं, कपडे बदलले. मग तो तरुण सॉक्रेटिसला म्हणाला,
“सर, काय हे? माझ्या प्रश्‍नाचं उत्तर नाही दिलं तुम्ही अजून.’
“मी कधीच उत्तर दिलंय.’
“कधी सर? मला नाही समजलं.’
“तुझं डोकं मी पाण्यात बुडवलं तेव्हा तू काय केलंस?’
“सर्व शक्ती एकवटून डोकं वर काढलं आणि श्‍वास घेतला.’
“मग कोणत्याही क्षेत्रातल्या यशाचं हेच तर रहस्य आहे. यशासाठी सर्व शक्ती एकवटूनच प्रयत्न करायला हवेत.’
“मी समजलो सर. तुम्ही फार ग्रेट आहात.’
“जा बाळा. यशस्वी हो.’
सॉक्रेटिस म्हणाले. तो तरुण समाधानानं सॉक्रेटिसच्या घरातून बाहेर पडला.

कथाबोध 

कोणत्याही कृतीमध्ये यश हवे असेल तर आपली सर्व शक्ती पणाला लावून आपण प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. आपली कृती, मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक ऊर्जा एकवटली तर कोणतेही अवघड काम आपण सहजपणे करू शकू. यशाचं रहस्य म्हणजे एकाग्रतेनं प्रयत्न करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)