#कथाबोध: मूर्खाची शिकवण आणि राजमूर्ख 

डॉ. न. म. जोशी 
 
एका राजाच्या पदरी अनेक विद्वान, कलावंत, गायक, शास्त्रज्ञ, सेनापती असे विविध प्रकारचे लोक होते. राजाला वाटलं आपल्या या दरबारात एखादा महामूर्खसुद्धा असला पाहिजे. म्हणून त्यानं प्रधानाला फर्मावलं. मूर्खाचा शोध घ्या आणि त्याला दरबारात घेऊन या. प्रधानांनी बरेच दिवस शोध केला. अनेक मूर्ख मिळाले. पण दरबारात शोभेल असा महामूर्ख हवा होता. 
त्यासाठीच्या शोधफेरीवर असतानाच प्रधानाला एक दृश्‍य दिसलं. 
एकजण झाडाच्या फांदीवर बसला होता आणि त्याच फांदीवर तो कुऱ्हाडीनं घाव घालत होता. 
स्वत:च बसलेल्या फांदीवर 
स्वत:ने कुऱ्हाड चालवणारा महामूर्ख असला पाहिजे, हे जाणून प्रधानांनी त्याला ताब्यात घेतलं आणि दरबारात हजर केलं. राजानं त्या मूर्खाची नेमणूक राजमूर्ख म्हणून केली. 
राजमूर्ख इतरांबरोबर दरबारात वावरू लागला. राजा कधी कधी संभाषण करून त्याच्याशी संवाद करायचा आणि त्या मूर्खाचे बोल ऐकण्याचा आनंद घ्यायचा! बोलून चालून मूर्खच तो! 
राजा आजारी पडला. राजाचा आजार वाढत चालला. राजवैद्यांनी 
खूप उपचार केले तरी प्रकृतीला 
आराम पडेना अनेक दरबारी लोक राजाची विचारपूस करण्यासाठी राजमहालात येऊन गेले. 
राजमूर्खही समाचारासाठी गेला. मात्र, जाताना त्यानं दरबारातील राजदंड स्वत:च्या हाती तो घेऊन गेला. राजमूर्खाला विचारलं… 
“महाराज तुम्ही बरे होऊन दरबारात कधी येणार?’ 
“आता कसला येतो मी? आता मी मोठ्या प्रवासाला चाललोय,’ राजा खोकत खोकत म्हणाला. 
“मोठ्या प्रवासाला? पण किती दिवसाचा प्रवा…स? बरोबर कुणाला नेणार? बरोबर काय घेणार?’ 
“अरे मूर्खा, या प्रवासात कुणालाच बरोबर न्यायचं नसतं; एकट्यानं जायचं असतं.’ तेव्हा आपल्या हातातला राजदंड राजाचा पायाशी ठेवून तो महामूर्ख म्हणाला.. 
“महाराज अंतिम प्रवास एकट्यानंच करायचा असतो ना! मग एवढी संपत्ती तुम्ही का जमा केली? हा राजमहाल कशासाठी? आणि राजवाडा तरी काय कामाचा…’ 
थोडं थांबून तो मूर्ख म्हणाला… 
“महाराज मूर्ख मी नाही. आपण आहात. अकारण लोभ केलात ना? हा घ्या तुमचा राजदंड.’ असं म्हणून तो मूर्ख पुन्हा वनात निघून गेला. 
कथाबोध 
माणूस जीवनभर लोभ करीत असतो. हव्यासानं धन जमवतो, इमारती, जमीनजुमला घेतो, तिजोरी दागिन्यांनी भरतो. एवढा आटापीटा केला तरी हे सगळं इथंच ठेवून माणसाला अंतिम प्रवासाला जायचं असतं. हे ठाऊक असूनही लोभाने तो धनसंचयाचा मूर्खपणा करीत राहतो. अखेरीस त्याला साक्षात्कार होतो की, आपण आजवर जे काही आपल्यासाठी करत होतो, त्यात कसलाच अर्थ कधीच नव्हता. 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)