कथाबोध: बचतीची जादू 

डॉ. न. म. जोशी 

धोंडीबा नावाचा शेतकरी होता. त्याचा मुलगा तुकाराम. तुकाराम आता लग्नाच्या वयाचा झाला. धोंडीबा आणि त्याची बायको सारजा… दोघेही आता थकलं होते. शेतीची कामं आता होईनात. आपल्याला हुशार सून मिळाली पाहिजे असे धोंडीबा आणि सारजाला वाटायचं. अनेक मुली बघितल्या. एक मुलगी पसंत पडली. सगुणा तिचं नाव. ती नावाप्रमाणं खरोखरीच गुणी होती. तुकाराम आणि सगुणा यांनी आता घराची सूत्र हाती हाती घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शेती चांगली पिकत होती. खाऊन पिऊन कुटुंब सुखी होतं.
पण एका वर्षी अवर्षण झालं आणि दुष्काळ पडला. शेती पिकली. काही पिकं पण वाळून गेली. एरवी घरातील कणगी धान्यानं भरलेल्या असायच्या. यावर्षी दोन कणगी रिकाम्याच राहिल्या.
उरलेलं धान्य कसंबसं पुरणार होतं. आपल्याला रोज किती धान्य लागतं याचा हिशोब धोंडीबानं केला आणि मग त्याच्या लक्षात आले की आता जेवढं धान्य आला आहे तेवढं फक्त अकरा महिने पुरेल. उरलेला एक महिना काय खायचं? बाहेरून धान्य विकत घ्यायला खूप पैसे पडतील.

धोंडीबा आणि सारजा चिंताग्रस्त होते. सगुणानं एक दिवस सासरेबुवांना कारण विचारलं. त्यांनीही मोकळेपणानं तिला सांगितलं. हुशार सगुणा म्हणाली, “काही चिंता करू नका बाबा मी सगळं सांभाळीन. तुम्ही त्यात लक्षच घालू नका.’
सुनेच्या या उद्‌गारांमुळे धोंडीबा आणि सारजा खूष झाले. पण सून नेमकं काय करणार हे त्यांना ठाऊक नव्हतं. ती बाहेर काम करून चार पैसे मिळवील; तर तसंही काही नव्हतं. होता होता दिवस सरले. महिने गेले.
अकरा महिने गेले. बारावा महिना आला. तरी रोजचा स्वयंपाक नेहमीप्रमाणेच होता. धान्य कमी पडलं नव्हतं. बारावा महिनाही सुखरुप गेला. धोंडीबानं एक दिवस आश्‍चर्यचकित होऊन सगुणाला विचारलं, “सूनबाई, तुमच्या हातात काही जादू आहे का? धान्य कुठून आणलं?’
सगुणा हसून म्हणाली, “मामंजी जादू माझ्या हातांची नाही जादू योजनेची आहे. अकरा महिने रोज मी फक्त एकेक मूठ धान्य बाजूला ठेवत होते. धान्याचा एक दाणाही कधी वाया घालवला नाही. त्याचं हे फळ आहे. जादू बचतीची आहे.’

कथाबोध 
जीवनाची योजनाबद्ध आखणी बचत, उधळमाधळ टाळणे आणि वस्तू नेमक्‍या तितक्‍याच वापरणे. यामुळे आपला जीवनक्रम सुखी होतो. बचतीची जादू कामी येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)