#कथाबोध: दृष्टी तशी सृष्टी…

डॉ. न. म. जोशी

महाभारतातील गोष्ट आहे. कौरव पांडवांचे गुरू द्रोणाचार्य होते. कौरव आणि पांडव दोघेही द्रोणाचार्यांकडे शिकत होते. दुर्योधन आणि युधिष्ठिर हे दोघेही गुरू द्रोणाचार्यांचे शिष्य. एकदा द्रोणाचार्यांनी एका वेगळ्या पद्धतीने आपल्या या दोन्ही शिष्यांची परीक्षा घेण्याचे ठरविले.

त्यांनी दुर्योधनाला पाचारण केलं आणि म्हणाले,
“”दुर्योधना, तू कोणाही सज्जन माणसाला माझ्याकडे घेऊन ये.
दुर्योधन सज्जनाच्या शोधात निघाला. गावोगाव हिंडला. त्याच्या मतानं त्याला कुणीच सज्जन दिसला नाही. शेवटी हताश होऊन तो परतला आणि म्हणाला,
“”आचार्य खूप प्रयत्न केला पण मला कुणी सज्जन मिळाला नाही.”
द्रोणाचार्यांनी केवळ त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला. ते काही बोलले नाही. मग त्यांनी युधिष्ठिाराला पाचारण केलं.

ते म्हणाले, युधिष्ठिरा तू आता कोणाही दुर्जन व्यक्‍तीला माझ्याकडे घेऊन ये’
“आज्ञा गुरुदेव’ असं म्हणून युधिष्ठिर दुर्जनाच्या शोधात निघाला.
गावोगाव हिंडला. खूप शोधलं पण महतप्रयासाने त्याला दुर्जन भेटला नाही.
युधिष्ठिर परतला. आचार्य द्रोण यांच्याकडे गेला आणि खाली मान घालून म्हणाला, “”आचार्य! आपल्या आज्ञेप्रमाणे मी खूप भ्रमंती केली. शोधाशोध केली पण अथक प्रयत्नानंतरही मला दुर्जन व्यक्‍ती सापडली नाही”
आचार्य द्रोण यांनी युधिष्ठिराकडे केवळ एक कटाक्ष टाकला. ते काही बोलले नाही.

उर्वरित कौरव पांडवांनी आचार्य द्रोण यांना विचारले, आचार्य, आपण
दुर्योधनास सज्जन व्यक्‍ती आणि युधिष्ठिरास दुर्जन व्यक्‍ती शोधून आणण्यास सांगितले पण दोघांनाही त्या त्या व्यक्‍ती मिळाल्या नाहीत. तेव्हा आचार्य! आपण त्यांना असं का सांगितले?”

आचार्य फक्‍त हसले आणि म्हणाले, “तुमच्या लक्षात आलं का? जगात सर्वत्र माणसं तीच आहेत. पण त्याच माणसांमध्ये दुर्योधनाला एकही सज्जन माणूस भेटला नाही आणि युधिष्ठिराला एकही माणूस दुर्जन मिळाला नाही. याच कारण दोघांची दृष्टी! दुर्योधनाची दृष्टी दुर्जनाची म्हणून त्याला सज्जन मिळाला नाही आणि युधिष्ठिराची दृष्टी सज्जनाची म्हणून त्याला दुर्जन मिळाला नाही. जशी दृष्टी तशी सृष्टी!

कथाबोध
आपण जगाकडे ज्या नजरेने पाहतो तसं जग आपल्याला दिसतं.आपण ज्या रंगाचा चष्मा लावू त्या रंगाची दुनिया भासते. तेव्हा आपली दृष्टी जशी असेल तशी सृष्टी आपल्याला भासते. सृष्टीचा रंग सृष्टीचाच? आपल्याला भासतो तो आपल्या दृष्टीचा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)