#कथाबोध: ज्ञानसागरातील ओंजळ 

डॉ. न. म. जोशी 
एका विद्वान आचार्यांच्या आश्रमात काही शिष्य ज्ञानसाधना करत होते. या शिष्यांपैकी दोघांचे शिक्षण पूर्ण झालं होतं. आचार्यांनी दोघांनाही दीक्षा देऊन आश्रमातून निरोप दिला.
एकाच नाव विद्यासागर आणि दुसऱ्याचं विद्यांकुर!
विद्यासागर आपल्या गावी गेला. विद्याकुंरही त्याच्या गावी गेला. विद्याकुंरानं आपल्या गुरुंचा वारसा चालविला होता. त्याने विद्यादानाचं कार्य सुरू केलं. विद्यासागर मात्र महान पंडित होऊन गावोगावी प्रवचने करू लागला. त्याची वाणी चांगली होती. लोक विद्यासागरांच्या प्रवचनांना गर्दी करू लागले.
ठिकठिकाणी विद्यासागरचे सत्कार होऊ लागले. जसजसे सत्कार होऊ लागले तसतसा त्याचा अहंकार फुलत गेला. विद्याकुंर मात्र ज्ञानदान करता करता आणखी ज्ञानसाधना करीत होता. मात्र त्याच्या तापसी वृत्तीमुळे त्याचा बोलबाला नव्हता.
एकदा विद्याधर आणि विद्याकुंर दोघेही मित्र भेटले. दोघांनाही खूपच दिवसांनी भेटल्यामुळे आनंद झाला. विद्यासागरच्या बोलण्यात काहीसा अहंकार भरला आहे, हे विद्याकुंरानं जाणलं.
मग तो मित्राला म्हणाला, “चल आज जरा भ्रमंतीला जाऊ. आपण आश्रमात असताना सागरतीरी जात होतो तसे आज जाऊ या का?’
“चल जाऊ या,’ विद्यासागरही खुषीत म्हणाला.
मग दोघेही मित्र सागरतीरी आले. खुप वेळ गप्पा झाल्या. निघण्याचे वेळी विद्याकुंराने ओंजळभर पाणी घेतले आणि तो विद्यासागरला म्हणाला, “हे बघ हा समुद्र आता माझ्या ओंजळीत आहे.’
“वेडा का रे तू? एवढा अथांग सागर समोर असताना तू ओंजळभर पाण्याला समुद्र म्हणतोय? अज्ञानी आहेस तू विद्यांकुरा!’
“होय, मी अज्ञानी असेन तर तू महाअज्ञानी आहेस. अरे, एवढा अफाट ज्ञानसागर अवतीभवती असताना तू ओंजळभर ज्ञानाच्या शिदोरीवर लोकांमध्ये मिरवतोयस!’
विद्यासागर काय समजायचं ते समजला. त्यानं मान खाली घातली. विद्यांकुरानं त्याच्या अहंकाराचा फुगा फोडला होता.
कथाबोध 
ज्ञानानं माणूस नम्र झाला पाहिजे. ज्ञानाचाही अहंकार झाला तर ते ज्ञानग्रहण खऱ्या अर्थाने ज्ञानसंपादन झाले आहे, असे म्हणता येणार नाही. आपल्या भोवती अफाट ज्ञानसृष्टी आहे. याची विनम्र जाणीव कोणत्याही ज्ञानसाधकाला असायला हवी.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)