#कथाबोध: चेंडू, मोती आणि वाळू 

डॉ. न. म. जोशी 

एक तरुण माणूस जीवनाला खूप कंटाळला होता. नोकरीसाठी प्रयत्न करीत होता. त्याला नोकरी लवकर लागत नव्हती. मग त्याला मित्र आणि नातेवाईक यांच्यापासूनही दूर राहावं, असं वाटायचं. एकदा अत्यंत कंटाळून तो त्याच्या शिक्षकाकडं गेला.
“सर मला जीवनात राम वाटत नाही काय करू?’ त्यानं विचारलं.
“बस जरा. पाणी पी. शांत हो. मग सांगतो,’ सर म्हणाले.
तो थोडा शांत झाल्यावर सरांनी एक मोठी काचेची पारदर्शक बरणी मागवली. त्यांनी त्या बरणीत छोटे छोटे रंगीत चेंडू टाकले. त्या चेंडूंनी बरणी भरली. त्यांनी विचारलं, “बरणी भरली का रे पूर्ण?’
“हो सर. बरणी चेंडूंनी पूर्ण भरली आहे,’ तरुण म्हणाला. “नाही. नीट बघ चेंडू गोल आहेत. तिथं मध्ये मध्ये जागा पोकळ आहे.’
“होय सर बरोबर आहे,’ तो म्हणाला. शेजारीच एका पात्रात काही मोती होते. सर म्हणाले, “आता यात मावतील एवढे मोती टाक.’ त्यानं मोती टाकले.
“बरणी भरली का रे?’ त्यांनी विचारले. “हो सर बरणी आता भरली.’
“नाही अजूनही थोडी थोडी पोकळी शिल्लक आहे.’
“हो सर. बरोबर. मग आता?’
“आता शेजारच्या भांड्यात बारीक वाळू आहे. ती या काचपात्रात टाक. मग बघ, सगळ्या पोकळ्या भरतील आणि खऱ्या अर्थाने भरणी भरेल.’ मग त्यानं वाळू टाकली. आता कुठंही पोकळी नव्हती. बरणी पूर्ण भरली गच्च.
“पण सर. तुम्ही हे मला दाखवत आहात?’ त्यानं कुतुहलानं विचारलं. “बाबा रे तुझं जीवन असंच ठेव. म्हणजे तुला कंटाळा येणार नाही. हे काचपात्र म्हणजे तुझं जीवन! यातील रंगीबेरंगी चेंडू म्हणजे तुझा परिवार तो तुझा मुख्य आधार. यातील मोती म्हणजे मित्रपरिवार, सोबती, शिक्षक, कामाच्या ठिकाणची माणसं. त्यांनी तुझं काचपात्र भर! वाळूचे कण म्हणजे वाईट माणसं, वाईट प्रसंग ते जीवनात असणारच. पण तुझ्या जीवनाचं काचपात्र चेंडू आणि मोतीने भरू दे.’
कथाबोध 
नातेवाईक, परिवार आप्त, मित्रता, सहकारी, सेवक मालक, मुले या सर्वांच्या सहवासात आपण आपलं जीवन आनंददायी रीतीनं घालवू शकतो. माणसं मिळवा, कंटाळा घालवा. आपलं जीवन सुसह्य बनवा. जीवनाचे सारे पैलू समजून घ्या आणि जीवन असेच समृद्ध करा.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)