#कथाबोध : गुरुदक्षिणा 

डॉ. न. म. जोशी 

सम्राट अकबराच्या दरबारी नवरत्ने होती. बिरबलासारखा चतुर प्रधान आणि तानसेनासारखा गायक हे त्या नवरत्नांपैकी होते. अकबर बादशहा गुणवतांचे कौतुक करणारा रत्नपारखी होता. तानसेनाचे गुरू होते स्वामी हरिदास! ते तपस्वी गायक होते. तानसेनाने आपली संगीतविद्या त्यांच्याकडून प्राप्त केली होती. तानसेन अकबराच्या दरबारी होता. त्याला त्यासाठी दरबारी इनाम मिळत असे. स्वामी हरिदास मात्र स्वतःच्या पर्णकुटीतच रहात होते. त्यांचीही संगीतसाधना अविरत सुरू होती.

-Ads-

एकदा अकबराच्या मनात आलं की तानसेन आणि त्याचे गुरू स्वामी हरिदास या दोघांचंही गायन दरबारात ठेवावं. पण स्वामी हरिदास दरबारात येऊन गायले नसते. म्हणून त्यांच्या कुटीच्या पलीकडेच शामियाना उभारून त्यात तानसेन गायला. त्या दिवशी तानसेन खूप समरसून गायले. गुरूंकडून घेतलेलं सारं कौशल्य त्यांनी पणाला लावलं होतं. अकबर खूष! दरबारी खूष.

आता यानंतर स्वामी हरिदास आपल्या पर्णकुटीतूनच गाणार होते. गाणं सुरू झालं. सम्राट अकबर, दरबारी लोक, रसिक मंडळी, स्वतः तानसेन स्वामी हरिदासांचं गायन ऐकत होते. लोक तल्लीन झाले होते.
त्यादिवशी स्वामी हरिदास उत्कृष्ट गायलेच. पण तानसेनही आपल्या गुरुइतकेच छान गायले. गुरू आणि शिष्य दोघांच्याही स्वरसौरभानं सारं वातावरण सुगंधित झालं होतं. दरबार संपला. आता दोघांचाही सत्कार होणार होता. सम्राट अकबर यांनी तानसेन यांना पुढं बोलावलं. महावस्त्र देऊन त्यांचा सत्कार केला आणि सुवर्णमोहरांनी भरलेलं एक तबक तानसेन यांना दिलं. आता स्वामी हरिदास यांचा सत्कार. सम्राट अकबरानं स्वामींचा महावस्त्र देऊन सत्कार केला आणि त्यांना सुवर्णमोहोरांनी भरलेली दोन तबकं भेट दिली. तानसेनाच्या मनात प्रश्‍न आला. आपणही आपल्या गुरूइतकंच छान गायलो. पण त्यांना दोन तबकं… आणि मला एकच तबक!

बिरबलानं तानसेनाच्या मनातील खळबळ ओळखली. विरबल म्हणाला,
“संगीतसम्राट तानसेन! तुम्ही दोघंही छान गायलात. त्याबद्दल प्रत्येकी एक तबक! पण तुझ्या गुरूंनी तुझ्यासारखा उत्तम शिष्य निर्माण केला त्याबद्दल त्यांना दुसरे तबक! तुम्ही शिष्य कुठे निर्माण केलात?’ या उत्तरानं तानसेन काय समजायचं ते समजले.

कथाबोध 
गुरुने केवळ स्वतः ज्ञानी होऊन चालत नाही. त्यांनी शिष्यपरंपरा निर्माण करावी. ज्ञान परंपरा मोठी करणं हेच गुरूचे महान कार्य होय.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)