#कथाबोध: गणगोतांचा लग्गा 

डॉ. न. म. जोशी 
निवडणुका आल्या की देशात एक निराळेच वातावरण तयार होते. अनेकांना उभे राहण्याची इच्छा असते. पक्षाकडून तिकीट मिळवावं यासाठी अनेक लोक धडपड करतात. पक्षांचे पदाधिकारी निवड करीत असतात. अनेकवेळा पदाधिकारी आपल्या गणगोतांना, नातेवाईकांना प्राधान्य देतात. मग इतर पात्र उमेदवार नाराज होतात. पक्षात मग अस्वस्थता निर्माण होते.
अशीच एक सार्वत्रिक निवडणूक!
उत्तर प्रदेशातील उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू होती. उमेदवार निवड मंडळाचे अध्यक्ष होते लालबहादूर शास्त्री. शास्त्रीजी अत्यंत निःस्पृह, न्यायी होते. पक्षाचा उमेदवार हा पूर्णपणे पात्र उमेदवार असावा असा त्यांचा आग्रह होता. निवड मंडळाच्या इतर सदस्यांकडं लोकांची रीघ लागली होती. आपापल्या नातेवाईकांचे नामांकन अर्ज भरून घेतलेले होते.
लालबहादूर शास्त्री यांच्या एका जवळच्या नातेवाईकानेही उमेदवारीसाठी निवड मंडळाकडे अर्ज केला होता. त्यासाठी त्यानं बराच काळ आधी शास्त्रीजींची भेटही घेतली होती. शास्त्रीजींनी त्याचं म्हणणं ऐकून घेतलं. पण त्याला कुठलंही आश्‍वासन दिलं नाही. त्या नातेवाईकाला खात्री होती की, बहुतेक निवडक मंडळाचे सदस्य आपल्या सदस्यांना तिकीट देतात, त्याप्रमाणे आपल्यालाही पक्षाचं तिकीट मिळेल. कारण आपण तर पक्षाच्या उमेदवार निवड मंडळाच्या अध्यक्षांचे जवळचे नातेवाईक आहोत.
निवड मंडळाची बैठक झाली. उमेदवारांची निवड झाली. ज्या उमेदवारांची निवड पक्षाने केली होती. त्यांची यादी काचफलकावर लावण्यात आली. लालबहादूर शास्त्री यांच्या नातेवाईकाला खात्री होती. पण त्यांचं नाव यादीत नव्हतं. त्यांना धक्का बसला. इतरांनाही धक्का बसला. नातेवाईक असून निवड नाही. मग एकदा निवड मंडळाच्या एका सदस्यानंच शास्त्रीजींना याबद्दल विचारलं.
“शास्त्रीजी, बरेच लोक आपल्या नातेवाईकांची वर्णी लावतात. तुम्ही नाही लावलीत?’
“मी नातेसंबंधापेक्षा पक्षहित आणि पर्यायाने देशहित याला प्राधान्य देतो माझ्या नातेवाईकांपेक्षा अधिक पात्र उमेदवार होता. त्याला कसं डावलू?’
शास्त्रीजींच्या या उत्तरानं सारेच उपस्थित थक्क झाले.
कथाबोध 
कोणत्याही कारभारात वशिलेबाजी लग्गा, वर्णी, आत्मसंबंध याचा अडथळा आला की कार्यहानी होत असते. देशहिताच्या, समाजहिताचा विचार करणारे निःस्पृह नेते केवळ नाते आहे म्हणून वर्णी लावणार नाहीत. आत्मसंबंध ही खासगी बाब आहे. सार्वजनिक जीवनात ही बाब कधीच विसरता कामा नये.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)