#कथाबोध: कर्तव्यकठोर वकील 

डॉ. न. म. जोशी
गुजरातमधील एक प्रसिद्ध वकील! त्यांची वकिली छान चालली होती. त्यांचा कोर्टात दबदबा होता. एकदा ते एका आरोपीचा खटला लढवत होते. ज्या आरोपासाठी त्या आरोपीला कोर्टात आणले होते. त्या आरोपावरून त्याला फाशीची शिक्षा झाली असती. पण त्या आरोपीच्या या वकिलानं केसचा अभ्यास केला आणि असं लक्षात आलं की, आरोपी खरोखर
निर्दोष आहे. पण त्यासाठी त्याचं निर्दोषत्त्व शाबित करावं लागेल. वकिलांनी कसून अभ्यास करून कैफियत मांडली.
अनेक दिवस खटला चालू होता.
आणि आता अगदी शेवटचा दिवस!
वकीलसाहेब आरोपीच्या बाजूने युक्तिवाद करीत होते. त्यानंतर न्यायमूर्ती निकाल देणार होते. वकील प्रभावीपणे भाषण करीत होते.
एवढ्यात, वकिलांच्या नावानं एक तार आली.
वकिलांनी ती तार वाचली. काही क्षण ते थांबले. त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. पण क्षणभरच! त्यांनी ती तार खिशात ठेवली आणि आपला युक्‍तिवाद प्रभावीपणं पूर्ण केला.
अर्थातच आरोपीचे निर्दोषत्व सिद्ध झाले.
त्याची फाशीची शिक्षा रद्द झाली.
कोर्टाबाहेर एकच गर्दी झाली होती. वकीलसाहेबांचं लोक अभिनंदन करीत होते. मग एका सहकारी वकिलाने विचारलं, “मध्येच तार कसली आली होती?’
“माझ्या पत्नीचं निधन झालं आहे. आता मी घरीच चाललो आहे,’ वकील म्हणाले.”आपल्या पत्नीचं निधन होऊनही आपण प्रभावीपणे आपला युक्‍तिवाद पूर्ण केला. कमाल आहे तुमची,’ दुसरे वकील म्हणाले.
“माझ्या पत्नीचं निधन तर झालेलेच होतं. पण आणखी एकाचं फाशी होऊन निधन होऊ नये म्हणून मी काळजावर दगड ठेवला,’ वकीलसाहेब म्हणाले.
सर्व लोकांना वकीलसाहेबांची ही कर्तव्यनिष्ठ वागणूक पाहून गदगदून आलं. हे कर्तव्यकठोर वकील म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल!
कथाबोध 
जीवनात दुःखाचे वा कसोटीचे अनेक प्रसंग येतात. पण धीरोदत्त व्यक्ती कर्तव्याला अधिक महत्त्व देऊन दुःख पचवतात आणि कर्माचा अवलंब करतात.
What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)