कथाबोध: ऐका तरी?

डॉ. न. म. जोशी

एका ख्यातनाम नगरातली एक बहुमजली इमारत. इमारतीला तीस मजले होते. तिसाव्या मजल्यावर एका प्रसिद्ध कंपनीचं कार्यालय होतं. कार्यालयात शंभर कर्मचारी हो. इमारतीला उद्‌वाहक होता (लिफ्ट) त्यातून रोज हे कर्मचारी ये-जा करीत. तिसाव्या मजल्यावर जाईपर्यंत एकमेकांशी गप्पा मारत. लिफ्टमन चांगला होता. त्या कंपनीचा एक शिपाईही रोज या कर्मचाऱ्यांबरोबर लिफ्टमधून ये-जा करत असे.
एक दिवस लिफ्ट बंद पडली. काही केल्या सुरू होईना. शिपायांसकट सारे कर्मचारी तळमजल्यावर होते. लिफ्ट लवकर सुरू होण्याचं चिन्हा नव्हतं.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सगळे कर्मचारी म्हणाले, “चला रोज लिफ्टमधून गप्पा मारत जातो तसं आता तीस मजले जिन्याच्या पायऱ्या चढून जाऊ. मग सगळे हसत खेळत पायऱ्या चढू लागले.
हे कर्मचारी गप्पा मारण्यात खूप रंगून गेले होते. कंपनीचा शिपाई पण त्यांच्याबरोबरच होता. तो मधूनमधून एकेकाला म्हणत होता…
“अहो, माझं ऐका. जरा थांबा.’
पण शिपायाचं कोण ऐकतो? त्या यत्कश्‍चित शिपायाचं ऐकायला कुणीही तयार नव्हतं. शिपायानं अनेकवेळा प्रयत्न केला. शेवटी सर्वजण तिसाव्या मजल्यापर्यंत जाऊन पोहोचले. तर काय?
ऑफिसला टाळं!
तिथं बाहेर शंभर माणसांना उभे राहायलाही जागा नव्हती.
एका कर्मचाऱ्यानं त्या शिपायाला विचारलं,
“काय रे, अजून ऑफिस का नाही उघडलं.’
“मी तुम्हाला तेच सांगतोय- मला तुम्हाला काही सांगायचं होतं.’
“काय सांगायचं होतं?’
“मॅनेजरच्या घरून मी रोज किल्ल्या आणतो. आज साहेब स्वतःच किल्ल्या आणणार आहेत. माझ्याजवळ किल्ल्या नाहीत. हे मी तुम्हाला खालीच तळमजल्यावर सांगत होतो. पण तुम्ही कुणी माझं ऐकूनच घेत नव्हता. आता इथं उभं राहायला जागा तरी आहे का?’ सगळे कर्मचारी पुन्हा खाली उतरले. शिपायाचं ऐकलं असतं तर तीस मजले चढण्याचा हेलपाटा वाचला असता. त्याचं ऐकायला हवं होतं.

कथाबोध
दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घेणे. दुसऱ्याच्या म्हणण्याला प्रतिसाद देणे हे कधीही आवश्‍यक असतं. जरा ऐकून घेण्याची सवय ठेवावी. म्हणजे पुढचे परिश्रम वाचतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)