#कथाबोध: एकच दुकान 

डॉ. न. म. जोशी 
एक धर्मप्रवण राजा होता. त्याला धर्म आणि तत्त्वज्ञान यांची आवड होती. पण त्याच्या विचारांमध्ये गोंधळ होता. राजानं निरनिराळ्या धर्मांचा अभ्यास केला. अनेक धर्मगुरुंना भेटला अनेक तत्त्वचिंतकांची धर्मचर्चा केली. पण राज्याच्या मनातला गोंधळ अधिकच वाढला. मग राजानं काय करावं! सर्व धर्माचार्यांना एकत्र बोलावलं आणि सांगितलं,
“जोपर्यंत तुम्हा सर्वांमध्ये एकमत होत नाही. विचारांत एकसूत्रता येत नाही तोपर्यंत तुम्हाला एकत्र बंदिवासात राहावं लागेल. बंदिवासात विचार करा आणि मग एक विचार झाला की तुम्हाला मी मुक्त करीन. राजानं सर्वांना बंदिशाळेत डांबलं. काही दिवसांनी दुसऱ्या राज्यातील एक महान विचारवंत या राज्यात आले. राजाला भेटले. राजानं त्यांचं आदरानं स्वागत केलं. राजा म्हणाला,
“आचार्य, आपण विद्वान आहात. आपण नगरप्रदक्षिणा करून आमची नगरी बघावी.’
“अवश्‍य बघू,’ असं म्हणून आचार्य नगर प्रदक्षिणेला निघाले वाटेत एका नगरवासीयानं त्यांच्या कानावर ही वार्ता घातली की राजानं धर्माचार्यांना एकविचारासाठी एक बंदिशाळेत डांबले आहे.
आचार्य नगरप्रदक्षिणा करून राजमहाली आले.
“कशी काय वाटली आमची नगरी?’ राजानं विचारलं.
“सुंदर आहे. बागबगीचे आहेत. महाल आहेत. भरपूर दुकानंही आहेत. फार सुंदर पण राजा, आम्हाला एक सूचना कराविशी वाटते.
“”करा ना! कोणती सूचना आहे आपली?”
“बाजारात अनेक वस्तूंची अनेक दुकानं आहेत. तिथं निरनिराळा माल मिळतो. पण ही सर्व दुकानं बंद करून त्याचं एकच दुकान करायला हवं.’
“आचार्य हे कसं शक्‍य आहे?’
“का शक्‍य नाही राजा?’
“आपणच सांगावं.’
“सांगतो राजन सर्व धर्माच्या लोकांना एकत्र डांबून एकविचार करणं शक्‍य असेल तर मग या सर्व दुकानांचं एक दुकान शक्‍य का नाही?’
राजा काय समजायचं ते समजला.
त्यानं सर्व धर्माचार्यांना मुक्त केलं.
कथाबोध 
तत्वज्ञानाच्या क्षेत्रात निरनिराळे विचारप्रवाह असतात. त्यांचा एक विचार करण्याचा आग्रह हा हट्टाग्रह आहे. विचारांची विविधता तत्त्वज्ञान क्षेत्राला समृद्ध करीत असते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)