#कथाबोध: आदर्श शिक्षक 

डॉ. न. म. जोशी 
नू.म.वि. मधील शिक्षक आणि नंतर स.प. महाविद्यालयात मराठीचे ख्यातनाम प्राध्यापक असलेले (कै.) डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे हे आदर्श शिक्षक, परखड समीक्षक आणि निर्भीड समाजचिंतक होते. समाजधारणेविषयी त्यांची काही मते होती; तशी ती वाङ्‌मयनिर्मितीसंबंधी होती. आपल्या विद्यार्थ्यांना ते अचूक पण परखड मार्गदर्शन करीत. त्यांचे काही नामवंत विद्यार्थी कवी, नाटककार होते. एका विद्यार्थ्याने एक छान कविता केली होती. तरुण वय! कविताही तशीच असणार-
तुझ्या-माझ्या रेषा समांतर
छेद कधी गेलाच नाही…
तुझी-माझी लय वेगळी
सम कधी साधलीच नाही…
तरीसुद्धा तुझे अश्रू
माझ्या पापणांना कसे पालवतात..
माझे शब्द तुझ्या ओठांत
कसे गं फुलतात?
सरांनी ही कविता वाचली. तो विद्यार्थी त्यांचा आवडता होता. अभ्यासू होता. सरांनी त्याला बोलावलं आणि ज्या अंकात ही कविता छापून आली होती. तो अंक व ते पान उघडून त्याला विचारलं… “हे काय आहे?’
“ही कविता आहे सर!’ तो विद्यार्थी चाचरत म्हणाला,
“पुन्हा असं लिहिलं तर फाडून टाकीन.’
“सर, कविता तुम्हाला आवडली नाही का?’
“अरे ही कविता नाही. केवळ प्रतिमांची उतरंड आहे; टाळ्या मिळवण्यासाठी! मीसुद्धा तुला हजार ओळी अशा लिहून दाखवतो घे लिहून…
तुझी माझी कुंडी वेगळी
झाड कधी लागलचं नाही
तुझी माझी लेखणी वेगळी
कविता कधी झालीच नाही
तुझा माझा रस्ता वेगळा
प्रवास कधी झालाच नाही
मग म्हणाले, “शब्द हा चमत्कार आहे. कविता भावली पाहिजे. आतून आली पाहिजे.’
तो विद्यार्थी थोडा हिरमुसला. सरांनी त्याच्या शब्दांची परखडपणे खिल्ली उडवली होती. पण योग्य मार्गदर्शन केलं होतं. असा कठोरपण दाखवला तर त्याच पु. ग. सहस्त्रबुद्धे सरांनी त्या विद्यार्थ्याच्या शस्त्रक्रियेवेळी स्वत: इस्पितळात जाऊन त्याची सेवासुश्रुषा केली होती. तो विद्यार्थी भारावून गेला होता.
कथाबोध
आदर्श गुरू हा तत्वज्ञ, मार्गदर्शक आणि मित्र असतो. तो परखड असेल पण प्रेमळही असेल. तो वाट चुकलेल्यांना कान धरून योग्य वाट दाखवेल. प्रसंगी शिक्षाही करेल. उमेद वाढवण्यासाठी त्याचा प्रेमळ हात शिष्याच्या पाठीवरून फिरेल. आदर्श शिक्षक हा असा नि:स्पृह, निर्भीड, व्यासंगी पण प्रेमळ असतो.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)