कथाबोध : आजीबाईची खिचडी 

डॉ. न. म. जोशी 

एक होता राजा. त्याचा प्रधान चतुर होता. राज्यकारभारात आणि एकूणच सर्व प्रशासनात तो राजाला योग्य मार्गदर्शन करीत असे. राजाला राज्याचा विस्तार करायचा होता. शेजारच्या राज्यावर स्वारी करायची होती. शेजारचं राज्य विशाल आणि विस्तृत होतं. चौफेर पसरलेल्या विस्तृत प्रदेशाच्या मध्ये राजधानी होती. या राजानं त्या राज्याच्या राजधानीवरच एकदम स्वारी करण्याचं ठरवलं. पाच हजारांचं घोडदळ होतं.

-Ads-

राजानं निकरानं राजधानीवर हल्ला केला. पण त्या राज्याचं सैन्यही भरपूर होतं. त्यांनी हल्ला यशस्वीपणे परतवून लावला. एवढंच नव्हे तर राजा आणि प्रधान एका हवेलीच्या तळघरात लपले होते. बाहेर आल्यावर आपल्याला कुणी ओळखू नये म्हणून त्या दोघांनीही वेषांतर केलं होतं. साध्या माणसांचे वेष धारण केले होते. एका ठिकाणी त्यांनी एक विलक्षण दृश्‍य पाहिलं. एका म्हातारीनं आपल्या नातवाला एक ताटलीत गरम खिचडी वाढली होती. खिचडी वाफाळलेली होती. तीवर गरम तूपही घातलं होतं. म्हातारी पाणी आणायला म्हणून शेजारच्या पाणवठ्यावर गेली.

इकडं मुलानं खिचडी खायला सुरुवात केली. मुलगा ओरडला, “भाजलं, भाजलं… बोट भाजलं.’ म्हातारी धावली. ती म्हणाली, “बेटा, खिचडी खूप गरम आहे. कडेकडेनं बोटांनी गोळा करून घास घ्यावा. मध्येच बोट घातलंस तर भाजणारच ना…’ मग मुलानं त्याप्रमाणे कडेकडेनं बोटांनी घास तयार केला. खिचडी फस्त केली हे दृश्‍य पाहून प्रधान राजाला म्हणाला, “महाराज आपणही असंच करायला हवं होतं. राज्यावर हल्ला करताना राजधानीवर हल्ला करण्या आधी सीमेवरचे प्रदेश ताब्यात घ्यायला हवे होते.’ त्याप्रमाणेच मग त्यांनी युद्धनीती बदलली आणि विजय संपादन केला.

कथाबोध 
कोणतीही कृती करताना ती केवळ धडक कृती आहे एवढ्याने त्या कृतीमध्ये यश मिळत नाही. चौफेर विचार करून योग्य दिशेने कृती केली तर त्या कृतीचा इष्ट परिणाम साध्य होतो. आधी अंदाज घ्यावा, आजूबाजूने निरीक्षण करावे आणि मगच मुद्याला हात घालावा.

What is your reaction?
8 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)