#कथाबोध: आंब्याची कोय व यती 

डॉ. न. म. जोशी 
महात्मा गौतम बुद्ध यांचे एक तरुण शिष्य गावोगाव सत्संग करीत होते. एका गावाकडे जात असताना राजनर्तकी आम्रपालीनं त्यांना पाहिलं. हा तरुण संन्यासी देखणा होता. आम्रपालीला भुरळ पडली. हा संन्यासी एका झाडाखाली बसला असताना आम्रपाली त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली, “माझ्याकडं चला. मला तुमचा पाहुणचार करायचा आहे.’
“आम्ही यती, संन्यासी! आपण राजनर्तकी. मी तुमचा पाहुणचार कसा काय घेऊ?’
“तुम्ही तुमंच तारुण्य फुकट घालवत आहात. का व्यर्थ घालवता जीवन?’
“मी आत्म्याच्या शोधात आहे.’
“ते बघता येईल की कधीही. पण माझ्या पाहुणचाराचा स्वीकार करा.’
“माझ्या गुरुंनी संमती दिली तर मी येईन. चालेल का?’
“या विचारून तुमच्या गुरूंना!’ आम्रपाली म्हणाली.
तरुण संन्याशानं महात्मा गौतम बुद्धांना विचारलं. त्यांनी आनंदानं संमती दिली. कारण त्यांना पूर्ण विश्‍वास होता की हा तरुण संन्यासी संयमशील आहे.
मग हा तरुण संन्यासी आम्रपालीकडं गेला. तिनं त्याचं यथोचित स्वागत केलं आणि धर्माला अनुसरून त्यानं फक्‍त फलाहार घेतला आणि तो निघाला.
“आता पुन्हा केव्हा याल?’
आम्रपालीनं व्याकुळ होऊन विचारलं.
“येईन केव्हातरी येईन,’ असं म्हणून संन्याशानं तेथीलच एक आंबा हातात घेतला आणि सांगितलं…
“मी येईपर्यंत हा आंबा जपून ठेव. त्याचा सांभाळ कर.’
आम्रपालीनं आंबा नीट ठेवला पण कितीही जपलं तरी ते फळच! दिवसेंदिवस आंबा नासू लागला. काही दिवसांनी तरुण संन्यासी आला त्यानं विचारलं…
“मी दिलेला आंबा कुठाय?’
आम्रपालीनं नासका आंबा दिला तरुण संन्याशानं तो सोलून त्यावरचं किडकं आवरण बाजूला केलं. आत स्वच्छ कोय होती. तो म्हणाला.
“”हे पहा राजनर्तकी! या आंब्यासारखाच देह नासतो. पण आत्मा कोयीसारखा उरतो. त्यामध्ये पुनर्निर्माणाची शक्‍ती असते. अशा कोयीच्या शोधात यती असतात.’
आम्रपालीनं यतीला नमस्कार केला.
कथाबोध 
भौतिक गोष्टीत जीवन साफल्याचा केवलानंद कधीच मिळणार नाही. तो क्षणिक आनंद असतो. पण त्यामध्ये क्षणभंगुरतेमुळे सृजनशीलता नसते. आंब्याचा रस आपण चाखतो. कोय फेकून देतो. पण ती कोयच पुन्हा एखादा आम्रवृक्ष निर्माण करू शकते. यतीनं हाच पाठ आम्रपालीला दिला. ही मूलभूत गोष्ट जर प्रत्येकाने लक्षात ठेवली, तर त्याचाही आत्मविकास होईल.
What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)