#कथाबोध: अडाणी इंजिनिअर… 

डॉ. न. म. जोशी
स्वातंत्र्यपूर्व काळातली गोष्ट आहे. मुंबईहून एक मेल रेल्वेगाडी निघाली होती. दक्षिणेकडे चालली होती. गाडीला तुफान गर्दी होती. प्रत्येक डब्यात माणसं खचाखच भरली होती. एका प्रथमवर्गाच्या डब्यात बरेच इंग्रज गोरे प्रवासी होते. डबा गच्च भरला होता. त्या सर्व प्रवाशांमध्ये एक प्रवासी मात्र वेगळा दिसत होता. त्याने धोतर नेसलं होतं. अंगात कुडता होता. बाकीचे बहुतेक सर्व प्रवासी उंची विदेशी पोशाखात होते. कुणी काही बोललं नाही. पण बहुतेक सर्व प्रवासी या धोतर कुडत्यातील प्रवाशाकडं पाहून “अडाणी दिसतोय कुणीतरी’ असा भाव चेहऱ्यावर आणत होते. हा अडाणी माणूस आपल्या आसनावर शांतपणे बसला होता.
एवढ्यात… हा अडाणी माणूस त्वरेनं उठला आणि त्यानं त्या डब्यातली साखळी ओढली. साखळी ओढल्यामुळं गाडीचा वेग कमी होऊन गाडी थांबली. गाडीचे गार्ड चौकशी करीत या डब्यापाशी आले. इतर गोरे प्रवासी या अडाणी प्रवाशाकडं काहीशा रागानं बघत होते. कारण त्यानं साखळी ओढली होती. गार्ड डब्यात आले त्यांनी विचारलं
“साखळी कुणी ओढली?’
“मी ओढली,’ तो प्रवासी म्हणाला.
“का ओढली?’
“गाडीच्या वेगात मला काही फरक वाटला. रुळांचा जो आवाज येतो तो वेगळा यायला लागला. पुढे काहीतरी धोका आहे असं मला वाटलं म्हणून मी चेन ओढली.’ या अडाणी प्रवाशाच्या म्हणण्याप्रमाणे ड्रायव्हर, गार्ड आणि तिकीट तपासणिसासह सर्व रेल्वे कर्मचारी पुढे एक किलोमीटर चालत गेले आणि एका ठिकाणी ते थबकलेच. अडाणी माणसाचं म्हणणं खरं होतं. तिथे रुळ उचकटले गेले होते. नट-बोल्ट बाजूला पडले होते. यावरून गाडी गेली असती तर भयंकर अपघात घडला असता. केवळ रुळांच्या घर्षणाच्या आवाजावरून या अडाणी माणसानं हा धोका ओळखला होता हा अडाणी माणूस म्हणजे प्रख्यात इंजिनिअर, भारतरत्न विजेते एम. विश्‍वश्‍वरैय्या!
कथाबोध 
माणसाच्या पोशाखावरून अथवा त्याच्या रंगरूपावरून त्याच्या ज्ञानाची पारख करू नये. “वेष असे बावळा, परी अंतरी नानाकळा’ असा अनुभव नेहमीच येत असतो. साधेपणा आणि दिखाऊपणा यातला फरक ओळखला पाहिजे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)