कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या 16 गायींची पोलिसांकडून सुटका

संगमनेरातील प्रकार : 1 लाख 60 हजारांची जनावरे, चौघांवर गुन्हा दाखल

संगमनेर – कत्तलीसाठी भाकड जनावरे बांधून ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकून 15 जिवंत गायी व 1 गोऱ्हा अशा 1 लाख 60 हजार रुपये किमतीच्या 16 जनावरांची सुटका पोलिसांनी केली. हा प्रकार रविवारी सायंकाळी 7.30 वाजता शहरातील जमजम कॉलनी येथे उघडकीस आला. यासंदर्भात चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील जमजम कॉलनी येथील मुश्‍ताक इब्राहीम तांबोळी यांच्या घराजवळील काटवनात कत्तलीसाठी भाकड जनावरे बांधून ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अन्सार इनामदार, हेडकॉन्स्टेबल अण्णा वाघ, इस्माईल शेख, राजू गायकवाड, लबडे, गाडेकर, आदी पथकासमवेत रविवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास जमजम कॉलनी गाठली. जवळच असलेल्या काटवनात त्यांना 15 गायी व गोऱ्हा अशी एकूण 1 लाख 60 हजार रुपये किमतीची 16 जनावरे आढळून आली. या सर्व जनावरांची पोलिसांनी सुटका करून त्यांना कऱ्हेघाटातील जीवदया चॅरिटेबल ट्रस्टच्या पांजरपोळमध्ये दाखल केले.
यासंदर्भात कॉन्स्टेबल साईनाथ चिमाजी वर्पे यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी आसद रौफ कुरैशी, कासीब आसद कुरैशी (रा. कादरी मस्जिद, संगमनेर), लाला उर्फ मुस्तफा रज्जाक कुरैशी (रा. मदिनानगर) व वाहीद करीम कुरैशी (रा. भारतनगर) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत यातील कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. या घटनेचा अधिक तपास हेडकॉन्स्टेबल अण्णा वाघ करत आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच याच भागात लाखो रुपयांचे गोवंश मांस आढळून आले होते. ही कारवाई होत नाही तोच ही नव्याने घटना घडल्याने राज्यात गोवंश मांस विक्रीला बंदी असतानाही अशा घटना वारंवार घडत आहे हे उघड झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)