कण्हेर, धोम कालव्यांच्या पोटपाटाचे काम संथगतीने

पाण्याअभावी ऊस पिक वाळले, पाटबंधारेच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकरी अडचणीत

कामेरी – सातारा तालुक्‍यातील शेती पाटाच्या पाण्यावर जास्तीत जास्त अवलंबून असते. परंतु, तालुक्‍यातील पोटपाटाची कामे संथ गतीने सुरू असल्याने ऊस पिक वाळून चालले आहे. पाटबंधारे खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून त्याची भरपाई या विभागानेच करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

सातारा तालुक्‍यातील 1980 सालापासून शेतीला कण्हेर व धोम कालव्याच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या माध्यमातून प्रत्येक वर्षी एकूण 9 पाण्याचे रोटेशन होणे गरजेचे असते. परंतु, 9 रोटेशन आजपर्यंत कोणत्याही वर्षी पूर्ण केलेली नाहीत. प्रत्येक वर्षी पहिले रोटेशन ऑक्‍टोबर महिन्यापासून रब्बी हंगामासाठी पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून पाटाला पाणी सोडून सुरू केले जाते. त्यामुळे पाणी रब्बी हंगामाच्या पिकांना किफायतशीर ठरते. तसेच हेच पाणी ऊसवढीला पोषक ठरते.

यावर्षी हे रब्बी हंगामाचे रोटेशन डिसेंबर संपत आला तरी पाटाला पाणी सोडलेले नाही. जाधववाडी ते तासगाव दरम्यान पाटाच्या दुरुस्तीमुळे शेतीसाठी पाणी सोडले जात नाही, वास्तविक हे पाटदुरुस्तीचे काम ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यातच होणे गरजेचे होते. मात्र, ते चालू रोटेशनच्या वेळी पाट दुरुस्तीचे काम केले जात आहे. या पाटांना पाणी सोडण्यासाठीची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी गेल्या महिन्यात आंदोलन करत पाटबंधारेच्या अधिकाऱ्याना निवेदन दिले होते. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी शक्‍य होईल तेवढ्या लवकर पाटाची दुरुस्ती पूर्ण करून पाणी लवकर सोडण्याचे आश्‍वासन दिले होते. ही आश्‍वासने तर दूरच, उलट पाटाच्या दुरुस्तीचे काम संथगतीने चालले आहे.

पाटबंधारे खात्याच्या यांत्रिकी विभागाकडे दुरुस्तीच्या कामासाठी लागणारी यंत्रणा असतानाही दुरुस्तीचे काम दर्जेदार नाही. दोन ते अडीच महिने झाले रब्बीच्या पिकांना पाणी मिळाले नसल्यामुळे रब्बीची पिके पूर्णपणे वाया गेल्याने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे हुकमी पीक असणारे ऊस पिक चिपडासारखे झाले आहेत. तासगाव आणि अपशींगे मंडलातील हजारो एकर शेतातील उसाची पूर्णपणे वाळून खाक झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ही झालेली नुकसान भरपाई पाटबंधारे विभागाने दिलीच पाहिजे, शेतकऱ्यांच्या थकीत पाणीपट्टीवर व्याज आकारले जाते त्यावेळी शेतकऱ्यांचा विचार होत नाही. मग आता या शेतकऱ्यांचे हे नुकसान झाले आहे ही नुकसान भरपाई ही दिलीच पाहिजे. व पीककर्जे सुद्धा पाटबंधारे विभागाने भरली पाहिजेत, अशी मागणी शेतकरी वेगातून होत आहे.

 

गेली अनेक दिवस आम्ही पाटाच्या पाण्यासाठी पाठपुरावा करत आहे पण पाटबंधारे विभाग गांभियाने घेत नसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांची राखरांगोळी झालेली आहे. त्याला जबाबदार पाटबंधारे विभाग आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढा थांबवणार नाही.
राजू शेळके
जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)