कडेपठारजवळील जयाद्री डोंगराला भीषण वणवा

  • दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्‍यात ः एमआयडीसीजवळही डोंगररांग पेटली

जेजुरी – खंडोबा मंदिर जेजुरी गडकोटाच्या दक्षिण दिशेला असलेल्या कडेपठार मंदिराकडे जाणाऱ्या जयाद्री डोंगररांगेला बुधवारी (दि. 21) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भीषण वणवा लागला; परंतु या परिसरात असलेले वनकर्मचारी, देवसंस्थानचे कर्मचारी गडकोटात असलेल्या ग्रामस्थानीं तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्‍यात आणली आणि मोठा अनर्थ टळला. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर वणवा आटोक्‍यात आला तरी डोंगर रांगेच्या पूर्व बाजूला म्हणजेच एमआयडीसी कडील डोंगराला त्यानंतर वणवा लागला, हा वणवा विझवण्यात वन कर्मचाऱ्यांना सायंकाळी उशिरा यश आले.
दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वन कर्मचारी गजानन बयास, वनपाल बाळासाहेब गोलांडे यांना रमणा परिसराच्या डोंगर रांगेला वणवा लागल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ देवसंस्थान कार्यालयात ही घटना कळवताच देवसंस्थानच्या कर्मचाऱ्यांसह गडकोटात असलेल्या राहुल बयास, यशवंत दोडके, सागर खोमणे यांनी वन विभागाच्या बगीचाकडे धाव घेतली. कर्मचारी संदीप दोडके, रवींद्र खोमणे, जालिंदर पवार, बाबा रोटे, मंगेश चव्हाण, हनुमंत भांडलकर, रामकृष्ण भोसले, अजित शिर्के, जालिंदर भोसले, शेखर शेंडकर, सुहास खोमणे, सुनील भोसले, अंकुश शेवाळे, आनंद शिर्के, आदींनी कडूनिंबाचा व तरवडाचा पाला हातात घेऊन वणवा विझवण्यास सुरुवात केली. आगीने रौद्र रूप धारण केल्याने डोंगर रांगेतील ससे, सरपटणारे प्राणी सैरावैरा धावताना दिसून येत होते. दोन हरणेही धावताना आढळून आली. सुमारे दोन तासानंतर वणवा विझवण्यात कर्मचाऱ्यांना यश आले आणि बहुतांश प्राण्यांचे जीव वाचवल्याचे समाधान असल्याच्या प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.
गडकोटामागील आग विझवल्यानंतर लगेचच पूर्व दिशेला एमआयडीसीच्या मागील बाजुच्या डोंगराला वणवा लागल्याचे वन कर्मचाऱ्यांच्या निदर्शनाला आले तेथील वणवा विझवण्यास रात्र झाली. दरम्यान नगरपालिका प्रशासनाकडे भ्रमणध्वनी वरून संपर्क करून अग्निशामक दलाचे वाहन वणवा विझवण्यासाठी बोलवण्यात आले होते; परंतु कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आग आटोक्‍यात आणली. त्यामुळे अग्निशामक दलाच्या वाहनांची गरज भासली नाही, असे यशवंत दोडके यांनी सांगितले.
डोंगर रांगेमध्ये सिगारेट, विडी, अथवा दुपारच्या वेळी झाडाची सावली पाहून चिलीम ओढणारे निदर्शनाला येतात अशा व्यक्तींच्या हलगर्जीपणामुळे वणवा लागण्याचे प्रकार होतात त्याला प्रतिबंध घालणे गरजेचे असल्याचे वन कर्मचारी गजानन बयास यांनी सांगितले.

  • त्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करणार
    देवसंस्थानचे विश्वस्त पंकज निकुडेपाटील, संदीप जगताप, शिवराज झगडे यांनी गडकोट आवारात धाव घेत माहिती घेतली. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे,. गडकोटाचे मागील बाजूस वन विभाग प्रशासनाकडून दहा कोटी रुपये खर्च करून बगीचा विकसित केला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी हरणे, ससे, मोर, विविध पक्षी आणि सरपटणारे प्राणी नेहमीच आढळून येतात. त्यांच्या पिण्याचे पाण्यासाठी मागील काळात स्थानिक कार्यकर्ते व स्वयंसेवी संस्थांच्या वतीने मोठ्या उपाययोजना राबविण्यात आल्या होत्या. भाविक अथवा नागरिकांच्या हलगर्जीपणाचा मोठा फटका डोंगर रांगेला अथवा गडकोट बाजूला होऊ नये म्हणून उपाययोजना करणे गरजेचे आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी वणवा विझवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे त्यांचा उचित सन्मान करणार असल्याचे देवसंस्थान विश्वस्तांनी सांगितले,,

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)