कडूस-वाळवणे रस्त्याचे काम निकृष्ट

कडूसमध्ये फुटलेल्या डॅमवरच केले डांबरीकरण : रुईछत्रपती येथील रस्त्याचा प्रश्न “जैसे थे’च!

सुपा – स्वातंत्र्य प्राप्तीनंतर प्रथमच कडूस-भोयरे गांगर्डा- रुईछत्रपती ते वाळवणे 11 कि.मी.चा रस्ता पूर्णावस्थेत आहे. मात्र, या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. विशेष म्हणजे कडूस गावालगत असणाऱ्या पुलाचे काम पूर्वीचेच ठेवण्यात आले आहे.
या ठिकाणी डॅमला मोठे भगदाड पडले असताना संबंधित ठेकेदाराने त्यावरच डांबरीकरण केले असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना मोठा धोका निर्माण झाला आहे. तर, रुईछत्रपती येथे हंगा नदीवर दोन सेतू पूल असताना प्रत्यक्षात जुन्याच पुलाची डागडुजी करून त्यालाच नवीन नंबरे उभे केले आहेत. तर, गावानजीक बाहेरून जाणारा रस्ता अद्यापि डांबरी न करता तसाच ठेवला आहे. एकूणच रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. याची चौकशी करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस संतोष गायकवाड यांनी दिला आहे.
आमदार विजय औटी यांच्या प्रयत्नांतून या 11 कि.मी. रस्त्यासाठी 5 कोटी 28 लाख रुपये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाले आहेत. त्याचे भूमिपूजन 22 डिसेंबर 2017 रोजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत आ. औटी यांनी कडूस येथे केले. रस्ता पूर्ण करण्याचा कालावधी एक वर्षाचा असताना अद्यापि रुईछत्रपती येथील रस्ता “जैसे थे’च आहे. रस्त्यावर खडी व डांबराचा वापर कमी प्रमाणात झाल्याने मोठ्या प्रमाणात खाचखळगे आहेत.

शेतकरी रस्त्यासाठी जमीन देण्यास तयार…
रुईछत्रपती गावात बाहेरून जाणारा रस्ता हा खासगी जागेतून जातो. या ठिकाणी रस्त्याच्या कडेला एका शेतकऱ्याचा जनावरांचा गोठा आहे. मात्र, खर्च दिल्यास रस्त्याची अडचण लक्षात घेता आम्ही जमीन देण्यास तयार असल्याचे तुषार पोपट दिवटे, रवींद्र गंगाधर दाते, विश्‍वनाथ दिवटे यांनी सांगितले.

15 दिवसांपूर्वी आम्ही रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी गेलो होतो. संबंधित शेतकऱ्यांनी रस्ता अडविला. शेतकऱ्यांनी कलेक्‍टर ऑफिसला अर्ज केला आहे. त्याची प्रत आम्हाला मिळाली आहे. हा रस्ता तसा करता येणार नाही. शेतकऱ्यांनी लेखी परवानगी दिली तरच रस्त्याचे काम करू अन्यथा नाही.
बेरड रावसाहेब, सुपरवायझर

रुईछत्रपती ते पठारेवस्ती रस्त्याचे चरच गायब!
कडूस – भोयरे गांगर्डा ते रुईछत्रपती रस्त्यादरम्यान साईडपट्ट्या करून रस्त्याच्या बाजूला पाणी जाण्यासाठी मोठमोठे चर खोदण्यात आले आहेत. रुईछत्रपती ते पठारेवस्ती दरम्यान साईडपट्ट्या कमी केल्या आहेत. चर तर गायबच आहेत. हे चर खोदलेच नाहीत. कडूस ते रुईछत्रपतीदरम्यान शेतकऱ्यांनी स्वखुशीने रस्त्यासाठी जमिनी दिल्या. त्यांनी गुन्हा केला काय? असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)