“कडा करप्या’साठी कृषी विभागाचा अर्धा खर्च!

भातपिकावर रोगाचा प्रादुर्भाव : औषध फवारणीसाठी 50 टक्‍के अनुदान

कामशेत – गेल्या काही दिवसांपासून मावळातील भात पिकावर कडा करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आल्याने कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आपल्या भात पिकावर फवारणी करण्याचे आवाहन करण्यात येते आहे. तसेच शेतकऱ्यांनी त्वरित फवारणी करावी म्हणून फवारणीसाठी लागणाऱ्या औषधाच्या खर्चावर कृषी विभाग 50 टक्‍के अनुदान देणार आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी दिली.

मावळातील माऊ, वाडेश्‍वर, नागाथली, वाहगाव, खांडी, सावळा, मालेगाव, किवळे, इंगळून, भोयरे, कशाळ, डाहुली आदी आंदर मावळातील गावांमध्ये भातपिकाचा पाहणी दौरा व भात पिकावर झालेला कीड रोग प्रादुर्भाव व कृषी विभागाने लावलेल्या फोरोमन ट्राप्स व ल्युअर्स याची पाहणी करण्यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत भोर, भातपीक शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र कारंडे, कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, मंडळ कृषी अधिकारी कुलकर्णी, कृषी सहाय्यक आर. पी. गायकवाड, बी. एस. पवार, एन. एम. शिंदे यांचा पाहणी दौरा मंगळवारी (दि. 5) झाला. या वेळी खांडी व कुसूर गावात कडा करपा रोगाचा भात पिकावर अतिप्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले.

याशिवाय अन्य गावात जीवाणू जन्य करप्या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यामुळे रोगाच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड 25 ग्राम + स्टेप्टोसायकलीन 2 ग्राम + 10 मिली स्टीकर प्रती 10 लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करण्याकरिता सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच खोड किडा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायझोफोस 40 इ.सी 625 मिली किंवा क्विनालफोस 25 इ.सी 1600 मिली या रासायनिक कीड नाशकांची प्रती 500 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी तसेच खेकडा नियंत्रण कसे करावे, याचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना शेतात जाऊन प्रत्यक्ष पीक पाहणी करून करण्यात आले.
मावळातील सर्व भात उत्पादक शेतकऱ्यांना भात पिकावरील फवारणीसाठी लागणाऱ्या औशादाच्या किमतीच्या 50 टक्‍के अनुदान कृषी विभाग देणार आहे. तर पीक प्रत्यक्षिके प्रकल्प राबविलेल्या सहा गावातील शेतकऱ्यांना 100 टक्‍केअनुदान देण्यात येणार आहे. अनुदान मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी फवारणी केल्यानंतर औषधाची बिले कृषी सहाय्यकाकडे द्यायची आहेत, त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्‍कम जमा होणार आहे.

भात पिकावरील रोगाचा प्रादुर्भाव सध्या आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या खाली आहे, तत्पूर्वी शेतकऱ्यांनी फवारणी करून घ्यावी, असे कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)