कठोर मेहनत, सरावातूनच उत्कृष्ट कुस्तीपटू घडतो

कोपरगाव, दि. 19 (प्रतिनिधी)- “”उत्कृष्ट कुस्तीपटू अथवा पहिलवान व्हायचे असेल तर शरीराला शिस्त लावावी लागते. आहार घेतानाही शिस्त असावी लागते. कठोर मेहनत व सराव केल्यानंतरच चांगला मल्ल किंवा उत्कृष्ट कुस्तीपटू घडतो. त्यासाठी करावे लागणारे कष्ट ही एक प्रकारची तपश्‍चर्या असून कुस्ती ही एक साधनाच आहे,” असे प्रतिपादन संत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज यांनी केले.
कोपरगाव येथे कर्मवीर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कुस्ती स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कर्मवीर काळे कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे उपस्थित होते.
आशुतोष काळे म्हणाले की, कर्मवीर प्रतिष्ठानने युवा महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण तसेच शहरी भागातील युवा वर्गाची गरज ओळखून त्यांच्या कला, क्रीडा व सांस्कृतिक गुणांना वाव मिळावा यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ही युवा वर्गासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. या युवा महोत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या युवा वर्गाला प्रोत्साहन देण्याचे काम कर्मवीर प्रतिष्ठान करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
कुस्ती स्पर्धेमध्ये 124 मल्लांनी सहभाग घेतला. यामध्ये मानाची कुस्ती मनमाडचा कुस्तीपटू शकील शेख व सोनईचा (ता. नेवासा) अनिल ब्राम्हणे यांच्यात झाली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या कुस्तीत अनिल ब्राम्हणे याने शकील शेखला धोबीपछाड देत 21 हजार रुपये व मानाची गदा पटकावली. कोपरगाव तालुक्‍यातील सर्व कुस्तीपटूंचा युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी विजय आढाव, सुनील गंगुले, फकीर कुरेशी, दिनार कुदळे, कृष्णा आढाव, नगरसेवक मंदार पहाडे, विरेन बोरावके, संदीप पगारे, राजेंद्र वाकचौरे, बाळासाहेब रुईकर, प्रसाद आढाव, विकास बेंद्रे, तुषार सरोदे, राजेंद्र बोरावके, मुकुंद इंगळे, नितीन बनसोडे, राजेंद्र आभाळे, गगन हाडा, संदीप सावतडकर, प्रसाद उदावंत, चंद्रशेखर म्हस्के, निखिल डांगे, रमेश गवळी, बाळासाहेब सोनटक्‍के, सुनील बोरा, गणेश लकारे, संतोष टोरपे, बापू वढणे, राजेंद्र खैरनार, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, विजय बंब, आदींसह कुस्तीशौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)