कठुआ बलात्कार प्रकरणाची सुनावणी चंदिगढमध्ये होणार?

नवी दिल्ली : कठुआ सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी राज्याबाहेरील कोर्टात करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने जम्मू काश्मिर सरकारला विचारणा केली. पीडित कुटुंबाच्या अर्जानंतर सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस पाठवली. जम्मू काश्मिर कोर्टात दाखल असलेल्या केसची रवानगी चंदिगढ कोर्टात करण्याची विनंती पीडित कुटुंबाने केली होती. याबाबत 27 एप्रिलपर्यंत उत्तर देण्यास सर्वोच्च न्यायालयाने जम्मू काश्मिर सरकारला सांगितले.

जम्मू काश्मिरच्या कठुआमध्ये जानेवारी महिन्यात आठ वर्षांच्या चिमुरडीवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. पीडितेच्या वडिलांनी आपले कुटुंबीय आणि वकिलांना सुरक्षा पुरवण्याची विनंती केली होती, त्यावरही लक्ष देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सांगितले.

सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आठ आरोपींपैकी एक जण अल्पवयीन आहे. त्याची रवानगी झालेल्या बालसुधारगृहात अतिरिक्त सुरक्षा पुरवण्याची विनवणीही पीडितेच्या वडिलांनी केली आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास करण्याची मागणी त्यांनी सुप्रीम कोर्टाकडे केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)