कचऱ्याच्या निविदेप्रकरणी सत्ताधाऱ्यांचा “यू टर्न’

 

पिंपरी – शहरातील कचरा आठ वर्षे उचलण्याच्या प्रसिद्ध केलेल्या नव्या निविदांना स्थगिती देत, जुन्याच निविदेत फेरबदल करत या निविदेला मान्यता दिली आहे. सुमारे 350 कोटी खर्चाच्या निविदेच्या ऐनवेळच्या प्रस्तावाला मान्यता देताना या प्रक्रियेत आगामी आठ वर्षांत 85 कोटी रुपयांची बचत होणार असल्याचा दावा स्थायी सदस्य विलास मडिगेरी यांनी केला आहे. त्यामुळे जुन्याच निविदांना मान्यता द्यायची होती, तर नवीन निविदा प्रसिद्ध तरी का केली? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

-Ads-

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर स्थायी समितीच्या सभापती सीमा सावळे यांनी आपल्या कार्यकाळात शहरातील कचरा उचलण्याच्या 570 कोटींच्या खर्चाला मान्यता दिली होती. शहराचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग करत अनुक्रमे बीव्हीजी आणि ए.जी. एनव्हायरो इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रा.लि. या दोन ठेकेदारांना कचरा उचलण्याचा ठेका दिला होता. याला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचीदेखील मान्यता घेण्यात आली होती. दरम्यान, सावळे यांच्यानंतर स्थायी समिती सभापती झालेल्या ममता गायकवाड व अन्य स्थायी सदस्यांनी ही निविदा रद्द करत, शहरातील कचरा उचलण्यासाठी चार ठेकेदारांच्या नियुक्तीची निविदा नव्याने प्रसिद्ध केली होती. या दोन्ही निविदांना राष्ट्रवादीने विरोध केला होता.
दरम्यान, एवढ्या प्रदीर्घ कालावधीसाठी ठेका देताना, मागचा-पुढचा विचार न केल्याचे आरोप स्थायी समितीवर झाले होते. त्यानंतर 27 सप्टेंबरला झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अवलोकनाच्या विषयाला 570 कोटींच्या खर्चाच्या उपसुचनेमुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला होता. सर्वसाधारण सभा व प्रशासकीय मान्यता असतानादेखील 570 कोटींच्या उपसुचनेमुळे भाजपवर चौफेर टिका झाली होती.

या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभुमीवर महापालिकेच्या वतीने नव्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. या नव्या निविदांना मान्यतादेखील देण्यात आली होती. मात्र, मंगळवारी (दि.9) पार पडलेल्या स्थायीच्या साप्ताहिक बैठकीत स्थायी समितीने अचानक “यू टर्न ‘ घेतला. नवीन निविदेला स्थगिती देत, जुन्या निविदेत फेरबदल केल्याने 85 कोटींची बचत होणार असून, दोन्ही ठेकेदारांनी प्रति टन 210 रुपये दर कमी केल्याने याचा फायदाच होणार असल्याने हा निर्णय घेतला आहे, असा दावा स्थायी सदस्यांनी केला आहे. शिवसेनेचे अमित गावडे आणि राष्ट्रवादीच्या गीता मंचरकर यांनी या प्रस्तावाला विरोध केला आहे. त्यांचा विरोध नोंदवून हा प्रस्ताव मंजुर करण्यात आला आहे.

ग्रीन वेस्ट व जनजागृती वगळली
कचरा उचलण्याच्या निविदा प्रक्रियेत तीन ग्रीन वेस्ट यंत्रांच्या खरेदीसाठी 1 कोटी 65 लाख रुपये खर्च येणार होता. या यंत्रांचा वार्षिक देखभाल दुरुस्तीचा खर्च 30 लाख रुपये होता. याशिवाय जनजागृतीसाठी फलक व अन्य माध्यमातून जाहिरात करण्यासाठी दरवर्षी 1 कोटी 49 लाख रूपये खर्च येणार होता. मात्र, जुन्या ठेक्‍यातील या दोन्ही बाबी वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे खर्चात मोठी बचत झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

शहरातील कचरा उचलण्यासाठी निविदा प्रक्रियेतील मे. बीव्हीजी आणि मे. ए.जी. एनव्हायरो इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रा.लि. या दोन्ही ठेकेदारांनी प्रति टनामागे 210 रुपये दर कमी करण्याचे लेखी पत्र स्थायी समिती व आयुक्त श्रावण हर्डीकर यांना 5 ऑक्‍टोबरला दिले होते. ही बाब संयुक्तीक वाटल्याने कचऱ्याचया समेस्ची तीव्रता लक्षात घेऊन, ऐनवेळी मांडलेल्या या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.
– ममता गायकवाड, सभापती, स्थायी समिती, पिंपरी-चिंचवड महापालिका

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)