कचरा संकलनाची फेरनिविदाच!

पिंपरी – महापालिकेने शहराचे दोन भाग करून आठ वर्षांसाठी दोनच ठेकेदारांना कचरा संकलनाचे काम देण्याचा निर्णय घेतला. मात्र, आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेली ही निविदा रद्द करून या कामासाठी फेरनिविदा काढण्यात आली. या निविदेची मुदत संपुष्टात आल्यानंतर पुन्हा दहा दिवसांची मुदतवाढ आरोग्य विभागाने दिली असून 30 ऑक्‍टोबरपर्यंत या कामासाठी निविदा भरता येणार आहे. दरम्यान, या निविदा प्रक्रियेला मुदतवाढ दिली असताना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी देखील फेरनिवेदेलाच प्राधान्य देण्याचे संकेत दिले आहेत.

पहिल्या निविदेमध्ये शहराच्या एका भागासाठी बी.व्ही.जी. कंपनी व दुसऱ्या भागासाठी मे. ए. जी. इनव्हायरो इंफ्रा कंपनीस काम मिळालेले आहे. या कामाला स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर गैरव्यवहाराचे आरोप झाल्याने स्थायी समितीच्या बदलेल्या पदाधिकाऱ्यांनी हे काम रद्द करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचा हवाला देत फेरनिविदा करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. प्रशासनाकडून फेरनिविदा काढली असताना अचानक स्थायी समितीने आधीच्याच दोन ठेकेदारांना हे काम देण्याचा निर्णय घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, स्थायी समितीने ठराव केला असला, तरी आमची फेरनिविदा सुरू असल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे. या वादग्रस्त कचरा निवि देप्रकरणी राष्ट्रवादीने न्यायालयात महापालिकेला आव्हान दिले होते. त्याबाबत बुधवारी (दि.24) झालेल्या सुनावणीत न्यायालयाने संपुर्ण निविदा प्रक्रियेची माहिती घेतली. त्यानंतर ही निविदा प्रक्रिया सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. न्यायालयाकडून या निर्णयाला स्थगिती नसल्याने सुरू असलेली फेरनिविदा पार पडण्याचा मार्ग प्रशासनासाठी मोकळा झाला आहे. तसेच, आरोग्य विभागाकडून सुरू असलेल्या निविदा प्रक्रियेची मुदत 20 ऑक्‍टोबर रोजी संपुष्टात आली. त्यानंतर आणखी दहा दिवस म्हणजे 30 ऑक्‍टोबरपर्यंत या निविदेला मुदतवाढ देण्यात आली. स्थायी समितीच्या ठरावानंतर आयुक्तांचे स्पष्टीकरण आणि निविदेला मुदतवाढ देण्यात आल्यामुळे प्रशासन फेरनिविदेला प्राधान्य देणार असल्याचे दिसते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)