कचरा टाकण्याचे पाप आळंदी की केळगावचे?

आळंदी – तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत आळंदी, केळगाव रस्त्यावर केळगाव हद्दीतील ओढ्यापर्यंत रस्ता रुंदिकरण, फुटपाथ व तेथुनच गेलेला प्रस्तावित रिंगरोड (बायपास) याठिकाणी मुख्य चौकाच्या दक्षिणेस अगदी रस्त्यावर गेली दोन वर्षांपासून बाराही महिने कचरा टाकण्याचे पाप आळंदीकर करताहेत की केळगांवकर ? याचा उलगडा अद्यापपर्यंत झाले नाही. त्यामुळे येथे अघोषित कचराडेपो झाल्याने नाक मुठीत घेवूनच नागरिकांना ये-जा करावी लागते आहे. तरी आळंदी आणि केळगाव यांनी हद्दीचा वाद न आणता दोघांनी जर अर्धा-अर्धा कचरा उचलला तर नागरिकांची गैरसोय टळणार आहे. मात्र, यासाठी कोण पुढाकार घेणार हा प्रश्‍न आहेच.
आळंदी-केळगाव रस्त्यावर रात्री-अपरात्री, जाता-येता दुचाकीवरून कचऱ्याच्या केरीबॅग भिरकावून देत याठिकाणी लांबचलांब कचरा डेपोच तयार झाला आहे. त्यामुळे स्थानिकांचे आरोग्यही धोक्‍यात आले आहे. दरम्यान, या कचरा कुंडीवर डुकरे, मोकाट कुत्री, जनावरे यांचा वावर सतत असल्याने हा कचरा इकडे-तिकडे पसरत असल्याने आजुबाजुच्या परिसरातही रोगराई वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
सुरुवातीला हद्दीवादावरून बरेच दिवस घोळ सुरू होता. अखेर केळगांव ग्रामपंचायतीने हद्द आपलीच असल्याचे मान्य करून त्याठिकाणचा कचरा उचलला देखील व नागरिकांच्या माहितीस्तव केळगाव ग्रामपंचायतीमार्फत त्याठिकाणी सुचना फलक लावण्यात आले आहे. त्यावर नमूद केले आहे की, या सार्वजनिक ठिकाणच्या वर्दळीच्या रस्त्यावर कचरा टाकल्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात येऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा फलक लावून देखील कचराबहाद्दरांनी या फलकाला कचऱ्याची टोपलीच दाखविली असून कचरा उचलून-उचलून ग्रामपंचायत मेटाकुटीस आली आहे.

  • अन्यथा स्वच्छ भारत अभियानाचे “तीनतेरा’
    आळंदी, केळगाव हद्दीतून लवकरच बायपास रस्ता सुरू होईल तत्पूर्वी ही निर्माण झालेला कचरा डेपो समुळ उपटून टाकावा त्यासाठी ठोस उपाययोजना करून तेथे काही दिवसांसाठी एक सुरक्षा रक्षक (कर्मचारी) नेमावा तरच ही घाण नाहिशी होईल, अन्यथा “येरे माझ्या मागल्या’ हे वर्षानुवर्षे असेच चालणारा अन्‌ स्वच्छ भारत अभियानाचे “तीनतेरा’ नक्कीच वाजणार, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
    पुर्ण: एम.डी.पाखरे, आळंदी.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)