नांदेड – डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एसटी विभागात साफसफाई करुन कचरा जाळण्याच्या कारणावरुन एका उच्चशिक्षित युवकाने बारा बोअर बंदुकीतून गोळी झाडून दहशत निर्माण केली़. ही थरारक घटना शुक्रवारी दुपारी एसटीच्या विभागीय कार्यालय परिसरात घडली़ पोलिसांनी या उच्चशिक्षित युवकाला ताब्यात घेतले आहे. नांदेड शहरातील श्रीनगर भागात एसटी महामंडळाचे विभागाय कार्यालय आहे. या कार्यालयाच्या संरक्षक भिंतीला लागून सहयोगनगर नावाचे निवासी संकुल आहे. यात पहिलेच घर सेवानिवृत्त प्रकल्प अधिकारी एन.डी.पठान यांचे आहे.
जिल्हा परिषदेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर एन.डी.पठान यांना वक्फ कार्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनविण्यात आले होते. तेथे एका लाच प्रकरणात साठ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वेळेत दोषारोपपत्र दाखल न केल्याने त्यांना जामीन मिळाली. एन.डी.पठान यांचे सर्वच कुटुंबिय सुशिक्षित आहे. त्यात त्यांचा एक मुलगा आसिफ पठाण हा संगणक अभियंता आहे. शुक्रवारी एसटी महामंडळाच्या मुख्य कार्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त साफसफाई आणि जमा झालेला कचरा जाळण्याचे काम सुरु होते. या कचरा जाळल्याने त्याचा धूर पठाण यांच्या घरात जात होता आणि याचा राग येवून आसिफ पठाण याने कामगारांना शिवीगाळ केली पण कामगारांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. तेंव्हा तो आपल्या हातात बारा बोअरची बंदूक घेवून एसटी विभागाच्या कार्यालय परिसरात आला आणि बंदुकीने लोकांना मारहाण करत त्याने एसटी विभागाच्या मोकळ्या जागेत उभे राहून हवेत गोळीबार केला, अशी माहिती एसटी विभागाचे संभाजी सावंत यांनी दिली.
अचानक झालेल्या या प्रकारामुळे सर्वांचीच धावपळ उडाली़ माहिती कळताच अपर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, उपअधीक्षक अभिजित फिस्के यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या भागात दाखल झाले. भाग्यनगरचे सहायक पोलीस निरीक्षक शरद मरे, पोलीस कर्मचारी गणेश धुमाळ आणि विलास कदम यांनी आसिफ पठाणला ताब्यात घेतले.पोलिसांना घटनास्थळी पडलेला गोळीबार केलेल्या रिकाम्या गोळीचा एक खोळ सापडला आहे. यासंदर्भात कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे.
ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा