कचरा करणारे शोधण्यासाठी सल्लागार नेमणार!

36 लाख रुपयांची उधळपट्टी : त्रयस्थपणे पाहणी करणार

पुणे – “स्वच्छ भारत अभियानां’तर्गत शहरात स्वच्छ सर्व्हेक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शहरात कोठे घाण आहे, कोठे कचरा केला जातो, या सगळ्या गोष्टींची माहिती आता सल्लागार कंपनी देणार आहे. ही माहिती देण्यासाठी महापालिका तब्बल 36 लाख रुपये मोजणार असून, त्यासंबंधीचा प्रशासनाचा प्रस्तावही मंगळवारी स्थायी समितीत मंजूर करण्यात आला.

स्वच्छ सर्वेक्षणाच्या सर्व निकषांत उत्तीर्ण होण्यासाठी संबंधित सल्लागार कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. स्वच्छ सर्वेक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेने “राज्य प्रकल्प व्यवस्थापन युनिट’ आणि शहर स्तरावर “प्रकल्प अंमलबजावणी युनिट’ स्थापन करणे गरजेचे आहे. “राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र सेवा संस्थे’ने (एनआयसीएसआय) सूचित केलेल्या संस्थांकडून हे काम करून घेण्याच्या सूचना राज्य मोहीम संचालकांनी दिल्या आहेत. त्यात महाराष्ट्रासाठी “केपीएमजी अॅडवायजरी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.

या कंपनीची शहरात स्वच्छ सर्वेक्षणासाठी प्रकल्प अंमलबजावणी युनिट म्हणून नेमणूक करण्याचा प्रस्ताव घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्थायी समितीसमोर ठेवला होता. त्याला स्थायीच्या मंगळवारच्या बैठकीत एकमताने मंजुरी देण्यात आली.

दरम्यान, घनकचरा व्यवस्थापनासाठी पालिकेने एक कोटी खर्चून “अर्नेस्ट अँड यंग’ संस्थेला सल्लागार नेमले आहे. तरीदेखील कोणतीही निविदा न काढता नवीन सल्लागार कंपनी नेमण्याचा घाट प्रशासनाने घातल्याचा आरोप सजग नागरिक मंचाने केला होता. स्वच्छ भारत मोहिमेच्या संचालकांच्या पत्रात ज्या शहरांसाठी संबंधित सल्लागार कंपनीचे नाव प्रस्तावित केले आहे, त्यात पुण्याचा समावेश नसल्याची बाब महापालिकेच्या दक्षता विभागाने दाखवून दिल्याचा दावाही मंचाने केला होता. त्यावर महापालिकेच्या स्थायी सल्लागार कंपनीच्या कार्यकक्षेत स्वच्छ सर्वेक्षणासाठीचे गुण मिळविण्यासाठी अपेक्षित कार्य नमूद नाही, स्थायी सल्लागार कंपनी घनकचरा व्यवस्थापनाबाबत धोरणात्मक नियोजन करण्याचे काम करत आहे. मात्र, स्वच्छ सर्वेक्षणाचे निकष क्‍लिष्ट असून त्यासंदर्भात अहवाल तयार करण्यासाठी नवीन सल्लागार कंपनी नेमल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. नवीन सल्लागार कंपनीतर्फे शहरातील अस्वच्छ जागांची त्रयस्थपणे (थर्ड पार्टी) पाहणी करून त्याचा अहवाल महापालिकेला देणार असल्याचे पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)