कचरामुक्‍त नदीसाठी राबविणार ‘ऑस्ट्रेलिया पॅटर्न’

प्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न : नदी दिनानिमित्त स्वच्छता मोहीम

पुणे – शहरातील नद्यांच्या प्रदूषणाचे मुख्य कारण हे सांडपाण्याद्वारे वाहून येणारा कचरा आणि घातक द्रव्ये असल्याचे विविध अभ्यासांतून समोर आले आहे. सांडपाणी वाहिनी, ओढे-नाले अशा सर्वच स्रोतांतून शहरातील कचरा वाहून नदीत मिसळतो. त्यापूर्वीच तो गोळा करण्यासाठी लवकरच “ऑस्ट्रेलियन पॅटर्न’ राबविण्याची तयारी महापालिकेतर्फे केली जात आहे. यामध्ये जाळीच्या सहाय्याने कचरा गोळा केला जाणार आहे.

भारतीय नदी दिनानिमित्त आयोजित नदीकाठ स्वच्छता मोहिमेत महापालिका आयुक्त सौरभ राव सहभागी झाले होते. ते म्हणाले, “नदी स्वच्छता ही महापालिकेसमोर मोठे आव्हान आहे. सांडपाणी तसेच थेटपणे नदीत फेकला जाणारा कचरा ही एक मोठी समस्या आहे. यावर मात करण्यासाठी वाहून येणारा कचरा नदीत मिसळण्यापूर्वीच जाळीच्या सहाय्याने तो गोळा करण्याबाबत विचार सुरू आहे. हा पर्याय कितपत योग्य ठरेल, याबाबत अभ्यास केला जात आहे.’

याबाबत जीवित नदी संस्थेतर्फे शैलजा देशपांडे म्हणाल्या, “कचरामुक्त नदीसाठी हा जाळीचा पर्याय नक्कीच फायदेशीर ठरेल. मात्र, आपल्याकडे सांडपाणी वाहिनी यंत्रणा आणि ओढे-नाले अशा दोन वेगवेगळ्या माध्यमातून नदीत कचरा येतो. त्यासाठी हा जाळीचा पर्याय जशास तसा स्वीकारण्यापेक्षा त्यामध्ये थोडेसे बदल करून त्याचा अवलंब केल्यास ते अधिक फायदेशीर ठरू शकतील. तसेच अनेकदा या जाळ्या चोरीला जाण्याची भीती असते. अशावेळी त्याठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणाही बसविली जाणे आवश्‍यक आहे.’

असा आहे “ऑस्ट्रेलिया पॅटर्न’

ऑस्ट्रेलिया येथील क्विनाना येथे सर्वप्रथम हा “ड्रेनेज नेट’चा उपाय राबविण्यात आला. यामध्ये सांडपाणी वाहिनी नदीत जाऊन मिळते, त्याठिकाणी वाहिनीच्या तोंडाला एक लोखंडी जाळी बांधली जाते. यामुळे पाण्याच्या योग्य निचरा होऊन सर्वप्रकारचा कचरा जाळीत अडकतो. यामुळे कचऱ्याचे संकलन सहजतेने होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)