पिंपरी – शहरातील कचरा समस्या सुटावी, अशी आमची मनापासून इच्छा आहे. मात्र, अवलोकनाच्या विषयाला चुकीच्या पद्धतीने विसंगत असलेली 570 कोटीच्या खर्चाची उपसूचना सत्ताधारी भाजपने दिली. पीठासन अधिकारी असलेले महापौर व आयुक्तांना देखील ही उपसूचना समजली नाही. राष्ट्रवादीच्या विरोधानंतर प्रति टन 230 रूपये दर कमी करण्यात आला आहे. आता सभागृह नेते एकनाथ पवार यांना भ्रष्टाचाराचे आणखी कोणते पुरावे हवे आहेत? असा प्रश्न विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे. बुधवारी (दि. 3) ते पत्रकारांशी बोलत होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने काढलेल्या 570 कोटींच्या कचऱ्याच्या निविदेला राष्ट्रवादीने विरोध केल्यामुळे ठेकेदाराने प्रति टन 230 रुपये कमी करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे महापालिकेच्या करदात्यांचे दरवर्षी सुमारे 55 कोटींची बचत होणार आहे. या निविदेत आणखी दर कमी करण्यास ठेकेदार तयार असताना, सत्ताधारी भाजपकडून कोणत्याही प्रकारचे प्रयत्न होत नाही. या निविदा प्रक्रियेत आतापर्यंत सहभागी झालेल्या 22 ठेकेदारांपैकी शेवटपर्यंत या प्रक्रियेत हे सर्व ठेकेदार राहणार नाहीत, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी पाणीपुरवठा विभागास टाळे ठोकले होते. त्यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर अगदी नावासह गुन्हा दाखल केला होता. आता पाणी पुरवठा विभागाच्या आढावा बैठकीत थेट अधिकाऱ्यांना दम भरणारे आमदार महेश लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल करून दाखवावा, असे आव्हान विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आयुक्तांना दिले आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकाजवळ आल्याने “इलेक्शन फंड’ गोळा करण्यासाठी दोन्ही आमदार अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. त्याचा भर विशेष करून पाण्यावर अधिक आहे. त्या माध्यमातून बांधकाम व्यवसायिकांना वेठीस धरून, दबाव वाढवून निधी’ गोळा करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप साने यांनी केला.
झोपडपट्टयांमध्ये स्वच्छता मोहीम राबवा
महात्मा गांधी जयंतीनिमित्त भाजप पदाधिकाऱ्यांनी पिंपरी चौक व परिसरातील स्वच्छ रस्ते स्वच्छ करीत “फोटोसेशन’ करून घेतले. या मोहिमेत दोन टन कचरा कोठून जमा झाला हेच समजत नाही. त्यांनी खरोखरच स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी झोपडपट्टीत अभियान घेणे गरजेचे आहे, अशी टीका दत्ता साने यांनी केली. महापालिकेच्या एक अधिकाऱ्याचा डेंग्यूने मृत्यू झाला असून, आता तरी महापालिका प्रशासनाने जागे व्हावे, असे ते म्हणाले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा