कंबरेचे स्नायू मोकळे करणारे -मत्स्यासन

डॉ. सुजाता टिकेकर

मत्स्यासन

नेहमीच्या योगाभ्यासामध्ये सर्वांगासन झाल्यानंतर सर्वांगासनाच्या वेळेच्या निम्मा वेळ हे मत्स्यासन टिकवण्याची शास्त्र आहे. त्यामुळे शरीराचा समतोल रहातो. हे शयनस्थितीतील आसन आहे. करायला सोपे पण योगतज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन मगच करावे. प्रथम उताणे झोपावे. उजवा पाय डाव्या मांडीवर व डावा पाय उजव्या मांडीवर ठेवावा. डोके वर करुन म्हणजेच हनुवटीवर आणि टाळू जमिनीला चिकटवून पोट व कंबर उचलावी. हनुवटीचा जालंधरबंध आपोआप होतो. ह्या स्थितीत दोन मिनिटं रहावं.

ह्या आसनामुळे स्त्रियांच्या मासिकपाळीच्या तक्रारी कमी होतात. हार्नियासारख्या आजारावरही याचा उपयोग होतो. मधुमेह नियंत्रणाखाली येतो. लैंगिक समस्या सुटतात. श्‍वासाचे रोग बरे होतात. श्‍वासपटल खुले होते. मान, चेहरा, फुफ्फुसे, हृदय यांना शक्ती मिळते. मत्स्यासन तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नियमित करावे.

मत्स्यासनामुळे कंबर उचलली जाते त्यामुळे कंबरेचे स्नायू जर जखडले असतील तर ते मोकळे होतात. तसेच पाठीवरही ताण येतो. छाती विस्तारीत होते. त्यामुळे श्‍वसनक्रिया चांगल्या पद्धतीने होते. दमेकऱ्यांनी हे आसन नियमित करावे. मुख्यत्वे ज्यांना कंबरदुखी, पाठदुखीचे विकार जडले आहेत त्यांनी हे आसन जरूर करावे. काही दिवस नियमित व सातत्याने केल्यामुळे त्यांची पाठदुखी आणि कंबरदुखी थांबते. मात्र हे आसन करणे उपयुक्‍त असले तरी ते तज्ञ योगशिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच हे आसन नियमित करावे.

पाठदुखीसाठी – सुप्तवज्रासन

यामध्ये आसनस्थिती ही शयन अवस्थेत घेतली जाते. प्रथम नेहमीचे वज्रासन घालावे. नंतर हाताच्या कोपराने जमिनीवर आडवे झोपावे. पाठीचा स्पर्श जमिनीला करावा. आपल्या दोन्ही हातांची घडी छातीवर घ्यावी. आपल्या डोक्‍याचा टाळू हा जमिनीला टेकला जाईल अशी अवस्था सुप्त वज्रासनात करता आली पाहिजे. काहीजणांचा शरीराचा पाठीचा भाग पूर्णत: टेकणार नाही. पण सरावाने हे आसन जमेल. हळूहळू शरीर मागे वाकवले जाते. हातांचा आधार घेत डोके किंवा टाळू मागे जमिनीवर टेकवावा. डोक्‍याखाली मऊ सुती कापडाची घडी घेतल्यास टोचणार नाही. हाताची घडी सोडून हात हळूहळू सरळ मांडीवर घ्यावेत. नेहमीचे श्‍वसन चालू ठेवावे. या स्थितीत एक मिनिटांपर्यंत सरावाने रहाता येते. पण एकदम वेळ वाढवू नये तर नियमित करत हळूहळू वेळ वाढवावा.
या आसनामुळे ओटीपोटावर ताण येतो व किडनीतील दोष दूर होतो, स्वादुपिंडातील पेशी कार्यरत होतात, मुख्य म्हणजे ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी सुप्त वज्रासन नियमित करावे. तसेच या आसनाच्या नियमित सरावाने पाठीचा कणा, मान आणि छाती बलवान होतात. लिव्हरचा त्रास कमी होतो. मूळव्याध असलेल्यांनी हे आसन नियमित करावे. थोडक्‍यात सुप्तवज्रासन शरीराचे सर्वच अवयव लवचिक बनवते. तज्ञांच्या मते सुप्तवज्रासनामुळे कुंडलिनी शक्ती जागृत होते. सुप्तवज्रासन हे पाठीदुखी आणि कंबरदुखी टाळण्यासाठी रोज नियमित करावे.

पोटाची चरबी कमी करणारे- शयनस्थितीतील नौकासन/ ताणासन

हे शयनस्थितील आसन आहे. प्रथम शयनस्थितीत म्हणजेच उताणे झोपावे, श्‍वास घेत घेत हात आणि पाय हळूहळू इतके वर घ्यावेत की नौकेसारखा शरीराचा आकार तयार झाला पाहिजे. ताण चांगला येतो. पोटावर पाठीवर हातापायांवर सुसह्य ताण घ्यावा. हे तोलात्मक आसन आहे. पण तरीही हे आसन अर्धा मिनिट टिकवता येते. हळूहळू कालावधी वाढवावा. यामुळे पोटाच्या स्नायूंना व्यायाम मिळतो तसेच कंबर आणि पाठीवर ताण येतो त्यामुळे त्यांचे कार्य सुधारायला मदत होते तसेच पचनक्रिया सुधारते आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. ज्यांचे पोटाचे ऑपरेशन झाले असेल त्यांनी डॉक्‍टरांच्या सल्ल्याने हे आसन करावे. पाठीच्या एकेक मणक्‍यावर सुसह्य ताण घेवून हे आसन टिकवावे. पाठीदुखी टाळण्यासाठी हे आसन नियमित करावे. मात्र कंबरेवर सुसह्य ताणच घ्यावा म्हणजे कंबरेचे स्नायू आणि हाडे बळकट होतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)