कंपन्यांतून भंगार मालासाठी खंडणीची मागणी

वाकी-उद्योग पंढरीचे नाक असलेल्या चाकण औद्योगिक वसाहतीतील चाकण-तळेगाव दाभाडे रस्त्यावरील महाळुंगे इंगळे (ता. खेड) गावच्या हद्दीतील बजाज कंपनीतून लाकडी भंगार माल घेऊन जाणारा टेम्पो अडवून त्याच्याकडून जबरदस्तीने वीस हजार रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर चाकण पोलिसांनी रविवारी (दि. 30) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांपैकी एकाच्या मुसक्‍या आवळल्या आहेत. तर फरारी झालेल्या एकाचा शोध घेतला जात आहे.
जीशान मेहमूद अली (वय 25, रा. कुदळवाडी; मूळ रा. कानपूर, उत्तर प्रदेश) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अली यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चाकण पोलिसांनी अक्षय नामदेव काचळे (रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड) याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करून त्याला रात्री उशिरा जेरबंद केले आहे. तर त्याचा साथीदार आल्हाट (पूर्ण नाव, संपूर्ण पत्ता समजला नाही) याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होताच तो फरार झाला आहे. शनिवारी (दि. 29) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी जीशान अली हा आयशर टेम्पो (एमएच 14 सीटी 3942) घेऊन टेम्पोचालक सेसमंत चौधरी याच्या समवेत चाकण औद्योगिक वसाहतीतील महाळुंगे इंगळे गावच्या हद्दीतील बजाज कंपनीमध्ये आला होता. या कंपनीत लाकडी बॅलेट भरले व टेम्पो बजाज कंपनीच्या रस्त्यावरून निघोजे गावच्या दिशेने कुदळवाडी गावाकडे घेऊन जात असताना रस्त्यात ठाकरवाडीजवळ एक डिस्कवर मोटरसायकल (एमएच 14 सीझेड 6382) चालकाने दुचाकी टेम्पोला आडवी मारली व टेम्पो रस्त्यातच थांबवला. त्यावेळी फिर्यादी अली याने त्यास विचारणा केली असता त्याने सांगितले की, येथील कंपन्यांकडून लाकूड खरेदी करण्याचे ठेके आम्ही घेतो. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त पैशांनी लाकडी बॅलेट खरेदी करता. त्यामुळे मला आता वीस हजार रुपये दिले तरच मी तुमचा टेम्पो पुढे जाऊ देईल, अन्यथा जाऊ देणार नाही. त्यानंतर एका मोटारीतून आलेल्या आल्हाट नामक इसमाने सुद्धा टेम्पोच्या समोर आपली आय ट्‌वेंटी मोटार गाडी उभी केली. त्यानंतर टेम्पोच्या चालकाने पैसे नाहीत. आम्हाला पुढे जाऊ द्या. अशी विनवणी केली. मात्र, या दोघांनी त्यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली.
टेम्पो चालक चौधरी व फिर्यादी अली यांनी अखेरीस टेम्पोचे मालक सौरभ अली यांनाया घटनेची माहिती दिली. सौरभ अली यांनी तातडीने चाकण पोलीस ठाण्याला याबाबत प्रकार कळविला. पोलिसांनी अक्षय नामदेव काचोळे यास ताब्यात घेवून त्याला गजाआड केले. त्यावेळी मोटारीतील आल्हाट हा ोटार गाडी घेऊन फरार झाल्याने त्याचा शोध सुरु आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)