कंपनीला साडेतीन कोटींचा गंडा

पुणे – भागधारकांची 18 बनावट खाती काढून अल्फा लावल इंडिया या कंपनीची तीन कोटी 62 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केलेल्याला दोन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी सोनु निर्मल अगरवाल (वय 38, रा. नवी मुंबई) याला अटक केली आहे. तर, नावेस ऑगस्ता डीसुजा याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत निशांत श्रीवास्तव (सोनिगीरा केसर, कस्पटे वस्ती वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. 1 एप्रिल 2017 ते 12 जुलै 2018 या कालावधीत लिंक इनटाईम इंडिया कंपनी ढोले पाटील रोड येथे हा प्रकार घडला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फिर्यादी हे काम करत असलेल्या अल्फा लावल इंडिया या कंपनीचे भाग स्टॉक एक्‍सचेंजमधून डिलीट करण्यात आले. त्यानंतर कंपनीच्या काही भागधारकांचे भाग हे रद्द झाले असल्याने कंपनीत असलेल्या शेअर्सच्या बदल्यात त्यांना प्रतिशेअर्स चार हजार देण्याचे ठरले. या शेअर्सची रक्‍कम लिंक इनटाईम इंडिया कंपनीकडून देण्यात येत होती. काही भागधारक मयत, काहींचे पत्ते बदलले असल्यामुळे ते कंपनीला मिळून येणार नाहीत, याची आरोपींना खात्री झाल्यामुळे त्यांनी कंपनीची फसवणूक करण्यासाठी कंपनीचे अधिकारी अजिंक्‍य कुलकर्णी, कर्मचारी संदीप पवार यांनी इतर अज्ञात लोकांनी मिळून 18 भागधारकांची बॅंक खाती त्यांच्या नावाने उघडली. मात्र, दुसऱ्या व्यक्तींना उभे केले. त्या खात्यांमध्ये फिर्यांदीनी जमा केलेले तीन कोटी 62 लाख रुपये काढून घेऊन कंपनीची फसवणूक केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

आरोपी अगरवालने अशा प्रकारे 11 भागधारकांची बनावट खाती काढून कैलास या नावाच्या व्यक्तीला दोन कोटी रुपये रोख स्वरुपात दिले. तर स्वत:चे तीन टक्‍के कमिशन म्हणून सात लाख रुपये घेतल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणी अगरवालला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याच्याकडे अधिक तपास करण्यासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील मैथिली काळवीट यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)