औरंगाबाद शहरात आता एसटी आणि स्मार्ट सिटी विकास महामंडळाची वाहतूक व्यवस्था

पहिल्या टप्प्यात १०० मिडी बसेसद्वारे होणार सुरुवात ; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घोषणा

औरंगाबाद: औरंगाबाद शहरवासियांना शहरांतर्गत प्रवास करण्यासाठी आता एसटी महामंडळ आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने चालविली जाणारी सिटी बस सेवा उपलब्ध होणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात १०० मिडी बसेस लवकरच शहरात दाखल होत आहेत. शहरांतर्गत होणाऱ्या या प्रवासी वाहतुकीसाठी एसटी महामंडळ आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी विकास महामंडळ यांच्या दरम्यान आज परिवहनमंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. औरंगाबाद शहरवासियांच्या सेवेत लवकरच एसटी आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी विकास महामंडळाची सिटी बस सेवा दाखल करीत आहोत, अशी घोषणा मंत्री दिवाकर रावते यांनी यावेळी केली.

 

एसटी महामंडळ आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी विकास महामंडळादरम्यान आज झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत पहिल्या टप्प्यात औरंगाबाद स्मार्ट सिटी विकास महामंडळ १०० मिडी बसेस खरेदी करून एसटी महामंडळाला देणार आहे. त्याद्वारे एसटी महामंडळ औरंगाबाद शहरांतर्गत या बसेसची सेवा सुरु करणार आहे. याचा फायदा औरंगाबाद शहरातील सर्वसामान्य जनतेला होणार असून शहर वाहतूक व्यवस्था सक्षम होण्यास त्यामुळे मदत होईल.

या सामंजस्य करारांतर्गत पहिल्या टप्यातील ५० मिडी बसेस ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दाखल होतील तर उर्वरित ५० बसेस पुढील वर्षी जानेवारी – फेब्रुवारी मध्ये प्राप्त होतील. एसटी महामंडळ आपल्या चालक – वाहकांमार्फत या बसेसची वाहतूक करणार असून मिळालेले उत्पन्न दररोजच्या दररोज थेट औरंगाबाद स्मार्ट सिटी विकास महामंडळाकडे जमा करण्यात येईल. या वाहतूक व्यवस्थेत तिकीट दराची आकारणी व वाहतुकीचे मार्ग निश्चित करण्याचे अधिकार औरंगाबाद स्मार्ट सिटी विकास महामंडळाला असून एसटी महामंडळ त्यांना आवश्यक ती मदत करेल.

या सामंजस्य करारांतर्गत विविध मुद्यांचा समावेश आहे. प्राप्त झालेल्या १०० बसेससाठी लागणारे मनुष्यबळ, बसेसची देखभाल व बसेसच्या पार्किंगची व्यवस्था एसटी महामंडळाकडून करण्यात येणार आहे. यासाठी एसटी महामंडळाला औरंगाबाद स्मार्ट सिटी विकास महामंडळाकडून दरमहा निश्चित रक्कम भाडे स्वरूपात मिळणार आहे. वाहतुकीचे मार्ग ठरवणे तसेच त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या घेणे ही जबाबदारी औरंगाबाद स्मार्ट सिटी विकास महामंडळ पार पडेल. वाहतुकीच्या बसेसचे तिकीट दर निश्चित करणे, त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्याचे अधिकार औरंगाबाद स्मार्ट सिटी विकास महामंडळाला असतील. त्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी विकास महामंडळाने एसटी महामंडळाच्या तिकीट दर सूत्राचा वापर करणे अपेक्षित आहे. मार्गावरील बस थांब्यांची जागा निश्चित करणे व बस थांबे बांधणे ही जबाबदारी औरंगाबाद स्मार्ट सिटी विकास महामंडळ पार पाडणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)