औरंगपूर खूनप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

पाथर्डी – तालुक्‍यातील औरंगपूर येथे दलित महिलेच्या खूनप्रकरणी गावातील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुलगी रंजना चांदणे (वय-40) यांनी फिर्याद दिली असून, आरोपींविरुद्ध खून करून जीवे ठार मारणे, तसेच अनुसूचित जाती-जमाती सुधारणा कायद्यान्वये पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ कोरडगाव येथे बंद पाळण्यात आला.

याबाबत तालुक्‍यातील औरंगपूर येथील मयत शांताबाई कसबे यांची मुलगी रंजना चांदणे यांनी फिर्याद दिली असून त्यामध्ये म्हटले आहे की, मी व आई शांताबाई कसबे असे आम्ही दोघी घराच्या दारात बसलेलो असताना घरासमोरून चक्रधर देशमुख हा जात असताना “माझ्याकडे काय पाहते?’ असे म्हणाला. यावर रंजना यांनी प्रतिउत्तर दिले असता चक्रधर देशमुख याने “जास्त उलट बोलू नकोस, मी तुला तोडून टाकीन,’ असे बोलून निघून गेला. त्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास रंजना चांदणे, आई शांताबाई कसबे व भावजयी असे बसलो असताना चक्रधर देशमुख, वसंत देशमुख, बबन देशमुख हे घरासमोर आले. त्यातील बबन व वसंत देशमुख म्हणाले, “आता यांना सोडायचे नाही.” तेव्हा चक्रधर याने त्याच्या हातातील कुऱ्हाडीने रंजना चांदणे हिच्या डोक्‍यात घाव घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

यावेळी आई शांताबाई कसबे व भावजयी सोडण्यासाठी आले असता चक्रधर याने शांताबाई कसबे यांच्या डोक्‍यात कुऱ्हाडीचा घाव घातला. त्यामुळे शांताबाई कसबे या जमिनीवर पडल्या. यावेळी जवळच बाजूला थांबलेले संजय देशमुख व दिगंबर देशमुख हे चक्रधर देशमुख यास तेथून घेऊन गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी मुलगी रंजना चांदणे यांच्या फिर्यादीवरून घटनेतील संबंधित वरील पाच जणांविरोधात अनुसूचित जाती-जमाती सुधारणा कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत चक्रधर देशमुख याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित शिवथरे हे करत आहेत. गुरुवारी दुपारी मयत शांताबाई कसबे यांचे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर औरंगपूर येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)