औरंगपूरमध्ये मातंग समाजाच्या महिलेची कुऱ्हाडीने हत्या

कोरडगाव – पाथर्डी तालुक्‍यातील औरंगपूर येथे मातंग समाजाच्या महिलेची जातीवाचक शिवीगाळ करून कुऱ्हाडीने हत्या केल्याचा प्रकार दुपारी 4 च्या दरम्यान उघडकीस आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपी चक्रधर देशमुख याला अटक केली.

औरंगपूर येथील 600 लोकवस्ती असलेल्या गावामध्ये मातंग समाजाची घरे अल्प प्रमाणात आहेत. येथील मातंग समाजाच्या लोकवस्तीमध्ये आपल्या मुलीसह राहत असलेल्या शांताबाई मरिबा कसबे (वय 57) यांना आरोपी चक्रधर देशमुख (वय 34) याने जातीवाचक शिवीगाळ करून कुऱ्हाडीने डोक्‍यामध्ये तसेच पायावर वार करून जागीच ठार केले. यावेळी तिची मुलगी रंजना चांदणे (वय 32) हिच्याही डोक्‍यामध्ये कुऱ्हाडीचा वार करून तिला जखमी केले.
शांताबाई कसबे यांना शवविच्छेदनासाठी पाथर्डी येथील शासकीय रुग्णालयामध्ये हलविण्यात आले असून, जखमी रंजना चांदणे हिला जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक पावसे, पोलीस हवालदार रेवणनाथ नजन, आदींनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीवरून जातीवाचक प्रतिबंधक कायदा ऍट्रॉसिटी व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)