औद्योगिक परिसरात रात्र गस्त वाढवावी

लघुउद्योग संघटनेची मागणी; पोलीस सहआयुक्तांची घेतली भेट
पिंपरी,  (प्रतिनिधी) – औद्योगिक परिसरातील वाढत्या चोऱ्या आणि कामगारांना सुरक्षितता वाटावी, यासाठी पोलिसांनी सहकार्य करावे. त्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी पुणे शहर पोलीस सहआयुक्‍त रवींद्र कदम यांच्याकडे केली आहे. पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली.

पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील तळवडे, कुदळवाडी, शांतीनगर, सेक्‍टर क्रमांक 7 आणि 10, प्राधिकरण या परिसरात तसेच, “एमआयडीसी’ परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. सुरक्षारक्षकावर हत्याराचा धाक दाखवून चोरी करतात. त्यावर हल्ला करण्याच्या घटनाही घडल्या आहेत. या संदर्भात एमआयडीसी-भोसरी पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकाऱ्यांना भेटून त्याबाबत तक्रार केल्या आहेत. मात्र, तपास करण्यास पोलीस अपयशी ठरत असल्याचे दिसून येते. उलट पोलीस संबंधित कंपनीतील अधिकाऱ्यांना “सीसीटीव्ही’ यंत्रणा बसवा, सुरक्षारक्षक नेमा असे सल्ले देतात. ते खर्चिक असल्यामळे सर्वांना परवडत नाही. तसेच, सध्याच्या औद्योगिक मंदीच्या काळात आर्थिक डबघाईमुळे उद्योजक संकटात सापडले आहेत.

पगार झाल्यानंतर उशिरा घरी जाणाऱ्या कामगारांना मारहाण करुन लुटले जाते. त्यामुळे त्यावर नजर ठेवून चोरीचा माल विकत घेणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, कंपनी परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी सहआयुक्तांकडे करण्यात आली आहे. या पूर्वी 2013 मध्ये स्वंतत्र गस्त पथक योजना राबवली होती. मात्र, ती बंद झाल्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पुणे शहराचे तत्कालीन आयुक्त गुलाबराव पोळ यांनी सुरक्षारक्षकांना शस्त्र परवाना देण्याचे आश्वासन दिले होते. त्याबाबत पुढे काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे “एमआयडीसी’ परिसर चोरीमुक्त आणि भयमुक्त करण्यात यावा, अशी मागणी सचिव जयंत कड, प्रमोद राणे, रवींद्र सोनवणे, महेंद्र देवी, विजय लाटकर, प्रसाद जाधव यांनी केली आहे.

उद्योजकांना गुंडप्रवृतींचा त्रास
“एमआयडीसी’मधील स्वयं घोषित माथाडी कामगार संघटना उद्योजकांना नाहक त्रास देतात. कंपनीत आमच्या कामगारांना कामावर ठेवा, त्यासाठी दबाव आणतात. तसेच, “प्रोटेक्‍शन मनी’ देण्यासाठी उद्योजकांना धमकवतात. कंपनीमध्ये चोरी व इतर त्रास होण्याच्या भीतीने उद्योजक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. तर, काही वेळा तक्रार करूनही ते त्रास देण्याचे थांबवत नसल्याचे अनुभव काहींना आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)