औद्योगिक गुन्हेगारीविरोधात “एल्गार’

मनुष्यबळ व्यवस्थापकांची एकजूट : “एनआयपीएम’तर्फे निषेध सभा

पिंपरी – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम) तर्फे पुणे, पिंपरी चिंचवड आणि परिसरातील औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या गुन्हेगारीविरोधात मनुष्यबळ व्यवस्थापकांतर्फे “एल्गार’ पुकारण्यात आला आहे.

झेड एफ स्टिअरिंग गिअर्स इंडिया लि. या कंपनीत उत्पादन व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले अस्लम कोठाळी यांना दि. 21 मार्च 2018 रोजी बुधवारी मध्यरात्री कामावरून घराकडे परतत असताना 5 ते 6 जणांनी बेदम मारहाण केली आणि रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यातील औद्योगिक परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. अशा घटनांना आळा बसावा या दृष्टीने काय उपाययोजना करता येतील याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम) तर्फे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड ऍग्रीकल्चर (एमसीसीआयए) च्या सुमंत मुळगावकर सभागृहात निषेध सभा आयोजित केली होती.

यावेळी “एनआयपीएम’च्या पुणे विभागाचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी सांगितले की एकीकडे संपूर्ण देशात पुणे जिल्ह्याची ओळख औद्योगिक विकासासाठी अग्रक्रमाने होत असताना दुसरीकडे वाढत्या गुन्हेगारीमुळे मनुष्यबळ व्यवस्थापकांच्या जीवितास धोका पोहोचत असेल तर अशा प्रसंगी पुण्यात हजारोंच्या संख्येने असलेल्या सर्व मनुष्यबळ व्यवस्थापकांनी आपली एकजूट दाखवून देण्याची वेळ आली आहे, तरच अशा दृष्टप्रवृत्तींना आळा बसू शकेल.

याप्रसंगी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ऍड ऍग्रीकल्चर (एमसीसीआयए) चे महासंचालक अनंत सरदेशमुख, ओ.एच.आर.चे प्रशांत इथापे, ऍड. आदित्य जोशी, व्हायब्रंट एच. आर. चे शंकर साळुंखे, भारत फोर्ज लि.चे वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापक डॉ. एस. व्ही. भावे, महिंद्रा व्हेईकल मॅनुफॅक्‍चरिंग प्रा. लि चे मनुष्यबळ व प्रशासन व्यवस्थापक महेश करंदीकर, आयएसटीडीचे योगेश उपाध्याय यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या निषेध सभेसाठी पुणे पिंपरी चिंचवड, चाकण, रांजणगाव, हडपसर, नगर रोड आदी भागातील विविध कंपन्यांचे सुमारे 300 हुन जास्त मनुष्यबळ व्यवस्थापक उपस्थित होते.

पोलीस प्रशासनाचीही जबाबदारी…
झेड एफ स्टिअरिंग गिअर्स इंडिया लि.चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक दिनेश मुनोत म्हणाले की, माझ्या 38 वर्षांच्या कारकिर्दीत ही खूप धक्कादायक बाब आहे. अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनानेही या घटनेच्या मुळाशी असलेल्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. यावेळी कामगार कायदे तज्ज्ञ ऍड. राजीव जोशी यांनी सांगितले की, या घटनेशी संबंधित गुन्हेगारांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई व्हायला हवी तसेच त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करताना खुनाचे कलम लावून कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)