औद्योगिक क्षेत्रातही मर्चंटने चांगला ठसा उमटविला

मर्चंट्‌स बॅंकेच्या वतीने उद्योजकांसाठी आयोजित स्नेहमेळाव्यास उत्तम प्रतिसाद

नगर – “”मर्चंट्‌स बॅंकेने आज अत्याधुनिकतेवर भर दिला आहे. विश्‍वासार्हता, तत्पर सेवा, गुणवत्ता तसेच पारदर्शकता याबद्दल बॅंकेची सर्व राज्यभर प्रचिती आहे. महत्त्वाचे म्हणजे या बॅंकेचा कारभार एकजुटीने व सचोटीने, तसेच राजकारणविरहीत सुरू असल्याने आज बॅंक प्रगतिपथावर दिसते. कोणत्याही एका समाजासाठी बॅंक कार्य करत नसून, बॅंकेच्या माध्यमातून सर्व समाजाचा उत्कर्ष कसा साधता येईल यासाठीही बॅंक आज कार्य करत आहे. ही बॅंक म्हणजे विकासाचा एक केंद्रबिंदू असून, आज नगरच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये येऊन बॅंकेने आपल्या चांगल्या कार्याचा ठसा उमटविला आहे,” असे प्रतिपादन अरविंद पारगावकर यांनी केले.

अहमदनगर मर्चंट्‌स को-ऑप. बॅंकेच्या एमआयडीसी शाखेच्या वतीने उद्योजकांचे प्रश्‍न समजावूून घ्यावेत व बॅंकेच्या विविध कार्याविषयी व कर्जाच्या सुविधेविषयी अधिक माहिती द्यावी, या उद्देशान चिंतामणी हॉल येथे उद्योजकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यास उत्तम प्रतिसाद मिळाला. लघू व मध्यम मिळून सुमारे 125 उद्योजक या मेळाव्यासाठी उपस्थित होते. या स्नेहमेळाव्याचे उद्‌घाटन मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स नगर शाखेचे अध्यक्ष व एल ऍण्ड टी कंपनीचे सहसरव्यवस्थापक अरविंद पारगावकर यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी आमी या उद्योजकांच्या संघटनेचे अध्यक्ष अशोक सोनवणे, अ.नगर ऑटो ऍण्ड इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कारभारी भिंगारे, भाजपाच्या उद्योग आघाडीचे शाखाप्रमुख विश्‍वनाथ पोंदे, बॅंकेचे अध्यक्ष संजीव गांधी, संचालक आनंदराम मुनोत, अनिल पोखरणा, मीनाताई मुनोत, प्रमिलाताई बोरा, संजय चोपडा, संजय बोरा, अमित मुथा, कमलेश भंडारी, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश कटारिया, जॉ. सीइओ नितीन भंडारी, शाखाधिकारी मदन मुनोत उपस्थित होते.

संचालक अनिल पोखरणा यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. अध्यक्ष संजीव गांधी यांनी बॅंकेच्या कार्याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, “”बॅंकेची स्थापना 1972 साली झाली असून, सध्या बॅंकेच्या ठेवी 1008 कोटी रुपयांच्या असून, 568 कोटी रुपयांची कर्ज आहेत. बॅंकेची स्वनिधी रक्कम 100 कोटीच्यावर असून, कर्जावर सर्वात कमी व्याज आकारणारी सहकार क्षेत्रातील बॅंकांमध्ये मर्चंट बॅंक ही राज्यातील एकमेव बॅंक आहे. बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष हस्तीमल मुनोत यांच्या मार्गदर्शनाखाली या बॅंकेची प्रगती होत आहे. बॅंकेच्या नगरमध्ये 7, जिल्ह्यामध्ये 4 व औरंगाबाद, पुणे येथे एक-एक अशा एकूण 13 शाखा असून, 9 नवीन शाखांनाही परवानगी मिळाली आहे. अत्याधुनिक सेवेबरोबरच या बॅंकेने ग्राहकांची विश्‍वासार्हता जपली आहे. त्यामुळेच स्थापनेपासून मर्चंट्‌स बॅंक आज यशस्वीतेकडे वाटचाल करत आहे.”
या स्नेहमेळाव्याचा उद्देश स्पष्ट करताना ते म्हणाले, “”ग्राहकांच्या सोयीसाठी आज मर्चंट बॅंक उद्योजकांच्या दारी आली असून, या मेळाव्यामध्ये त्यांनी गृह, वाहन, शैक्षणिक, सोनेतारण, व्यवसाय, लघुउद्योग व एल आय सी कर्जाविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. उद्योजकांनी या मेळाव्यास दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद मानले. बॅंकेमध्ये जीएसटी भरणा देखील सर्व शाखेमध्ये स्वीकारला जातो. औद्योगिक क्षेत्रातील गती वाढीस लागली आहे. उलाढाली मोठमोठ्या होत आहेत. उद्योजकांना या सर्व बाबींसाठी निश्‍चितच आर्थिक पाठबळाची गरज भासते. परंतु, बॅंकिंग क्षेत्रातील अनेक जाचक अटी, नियम, कायदे, बंधने यामुळे कर्ज मिळण्यास विलंब होतो. यासाठी संबंधित बॅंकांशी चर्चासत्रे घडवून यातून काही चांगले मार्ग काढता येतील का? यावर बॅंकांनी आज विचार करण्याची गरज आम्हाला वाटते. या कर्जाच्या विलंबामुळे व जाचक अटींमुळे सर्वच क्षेत्राचे मोठे नुकसान होते व यातून सर्वांगीण विकास साधण्यास अडसर निर्माण होतो. मर्चंट्‌स बॅंकेच्या उत्कृष्ट सेवेची व चांगल्या कार्याची दखल घेऊन एम.एस.सी. बॅंक असोसिएशनने गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने मर्चंट बॅंकेस राज्यातील उत्कृष्ट बॅंक पुरस्काराने गौरविले आहे. सध्या अहमदनगरमध्ये 20 मोठे उद्योग व 400 लघू व मध्यम उद्योग आहेत. संपूर्ण नगर शहरातील उद्योग व व्यवहारही यावर अवलंबून असल्यामुळे वरील बाबींचा आपण जरूर विचार करावा, असे आवाहन अरविंद पारगावकर यांनी केले.

अशोक सोनवणे व कारभारी भिंगारे यांनीही, मर्चंट बॅंकेने आज या स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून उद्योजकांशी संवाद साधला व उद्योजकांच्या असलेल्या प्रश्‍नांचे व विचारांचे आदानप्रदान केले. मर्चंट्‌स बॅंकेच्या विविध योजनांची माहिती मिळाली त्याबद्दल त्यांनी बॅंकेचे आभार मानले.
याप्रसंगी उपस्थित लघुउद्योजक एस. एस. एंटरप्राईजेसच संचालक सतीश व गणेश गवळी यांनी मर्चंट्‌स बॅंकेचे अध्यक्ष गांधी, संचालक व अधिकाऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार केला. सुरुवातीपासून आमच्या उद्योगाच्या उभारणीमध्ये आमच्यावर विश्‍वास दाखवून बॅंकेने आमच्या आयुष्याचा पाया रचल्याचे सांगितले. या मेळाव्यात बॅंकेच्या प्रगतीविषयी स्लाईड शोद्वारे सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी उद्योजकांनी विचारलेल्या प्रश्‍न, शंकांचे अध्यक्ष संजीव गांधी यांनी समर्पक उत्तरे दिली. बॅंकेचे कर्मचारी खान व परदेशी यांनी याचे सादरीकरण केले. शेवटी संचालक संजय बोरा यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)