औद्योगिकरणाची ऐशी तैशी – झारीतल्या शुक्राचार्यांचा मनमानी कारभार थांबवा

संदीप राक्षे

सातारा – नगरपालिकेने लघुउद्योगांसाठी विकसित केलेल्या करंजे एमआयडीसीत नियमांचा धरबंद उरलेला नाही. लघु उद्योजक सोडून धनदांडगे व्यापारी या पट्ट्यात घुसल्याने कारवाईचा गुंता झाला आहे. सत्ताधारी व व्यापारी यांची आर्थिक तडजोड सोयीस्करपणे होण्यासाठी पालिकेच्या तिजोरीत जाणीवपूर्वक दुष्काळ ठेवण्याची अभद्र रणनीती वेळोवेळी आखली जात आहे.

भूखंडांचे वाटप केलेल्या करंजे एमआयडीसीत अनेकांनी बेकायदा बांधकामे केली. याप्रकरणी नेमलेल्या समितीने पाहणी करून अहवालही तयार केला. मात्र, तरीही सातारा नगरपालिकेकडून जाणीवपूर्वक कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे एमआयडीसी भूखंडाचे श्रीखंड कुणीकुणी चापले? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सातारा नगरपालिका ही हद्दीबाहेर विविध ठिकाणी मिळकत असणारी राज्यातील एकमेव स्थानिक स्वराज्य संस्था मानली जाते.

नगरपालिकेने साधारण 25 वर्षांपूर्वी करंजेतील मालकीचे भूखंड एमआयडीसीसाठी नाममात्र भाडेपट्ट्यावर दिले. त्या भाडेपट्ट्यांची मुदत संपून गेली. मात्र, संबंधितांकडून भूखंड काढून घेण्याची प्रक्रिया पार पडली नाही. तीन वर्षांपूर्वी काही नगरसेवकांनी या भूखंडाची मुदत संपल्याचे सांगून त्या ठिकाणी बड्यांनी बेकायदा बांधकामे केल्याचे पालिका सभागृहात जाहीर करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती.

या प्रकरणी त्यावेळच्या नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. शहर नियोजन विभाग, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पदाधिकाऱ्यांनी सर्व्हे केला. त्याचा अहवाल तयार असल्याचेही त्यानंतर सांगितले गेले. मात्र, तरीही नगरपालिकेकडून संबंधितांवर आजतागायत कारवाई झालेली नाही. एमआयडीसी भूखंड काढून घेण्याचा आग्रह करणारे आता त्यावर चकार शब्द का काढत नाहीत? असा सवाल केला जात आहे.

या एमआयडीसीतील बरेच भूखंड उद्योगधंद्यांविना पडून आहेत. काही भूखंडांचा वापर इतर कारणांसाठी केला जात आहे. त्यामुळे असे भूखंड नगरपालिकेने काढून घ्यावेत, अशीही मागणी होऊ लागली आहे मात्र लोकसभेच्या ऐन धामधुमीत राजकीय इच्छाशकती कोण दाखवणार हा खरा मूळ वादाचा मुद्दा आहे. कारण नेते आता कोणालाच दुखावण्याच्या मनःस्थितीत नाही.

करंजे एमआयडीसीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई व्हावी, यासाठी शिवसेनेने आंदोलन केले. त्यावर पालिकेने कारवाईचे आश्‍वासन दिले. सध्या मात्र आंदोलने शांत होऊन प्रशासनालाही दिलेल्या शब्दाचा विसर पडलेला आहे. कारवाई होत नसल्याने न्यायालयात याचिका दाखल होऊनही प्रशासन ढिम्म आहे. नगरपालिकेत नव्याने आलेले बरेचजण जुन्यांपैकीच एक होऊन गेल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)