ओव्हरफ्लोचे पाणी शेतीसाठी देण्यास मान्यता

कोपरगाव, (प्रतिनिधी) – सध्या गोदावरी नदीस ओव्हरफ्लोचे पाणी सुरू असून ते कालव्याद्वारे सोडून बिगर सिंचन पाण्याबरोबरच शेती पाण्याचे आवर्तन करावे, अशी मागणी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली असून, त्याला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी तत्वतः मान्यता दिली आहे.

गोदावरी कालवे सल्लागार समितीची सभा मंगळवारी मुंबईत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात झाली. त्यावेळी आ. कोल्हे यांनी ही मागणी केली. या बैठकीस राज्यमंत्री विजय शिवतारे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, उपसचिव उपासनी, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता राजेश मोरे, कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, उपअभियंता भास्कर सुरळे, आदी उपस्थित होते.

आ. कोल्हे म्हणाल्या, “”गोदावरी नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे. मात्र, कालवे उपाशी आहेत. गावतळी, पाझर तलाव, बंधारे भरून द्यावे. तसेच ओव्हरफ्लोचे पाणी सोडून नियमित खरीप आवर्तन करावे. गोदावरी उजव्या आणि डाव्या कालव्यास सध्या कर्मचारी संख्या मोठ्या प्रमाणात कमी आहे. कालव्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अन्यत्र बदल्या करू नये व रिक्त असलेली पदे तत्काळ भरावीत, तसेच वैजापूर नगरपालिकेने पिण्यासाठी गोदावरी डाव्या कालव्यातून पाणी न घेता त्यांनी ते नांदूर मध्यमेश्‍वर जलद कालव्याच्या आवर्तनातून घ्यावे असे मागील बैठकीत ठरलेले असताना त्यावर कार्यवाही होत नाही.”

याबाबत ना. महाजन यांनी संबंधितांकडे विचारणा करून या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी व्हावी, असे आदेश दिले. गोदावरी खोरे हे अतितुटीचे आहे; तेव्हा बिगर सिंचन पाण्याचे आरक्षण सर्व धरणांवर समप्रमाणात विभागण्याचा निर्णय झाला असून तोही अंमलात आणावा, अशी मागणी आ. कोल्हे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)