ओळख

आरती मोने

परवा रस्त्याने जाताना सहज एका बाईंनी थांबविले आणि तू कोणत्या शाळेत होतीस? असे विचारले. मी सांगताच ती उद्‌गारली- मला वाटलंच तू अपर्णा साठे ना- मी तुला ओळखलं होतं. अगं मी स्मिता भातखंडे- आपण शाळेत एकत्र होतो ना. मला पण एकदम भूतकाळ आठवला. माझे मन शाळेच्या दिवसात पोचले. इतक्‍यात वर्षांनंतर तिने मला रस्त्यात थांबवून ओळखले होते. खूप गप्पा मारल्या. आम्ही जुन्या मैत्रिणींच्या आठवणीत रमलो. शाळेतील बाईंच्या, वर्गात केलेल्या दंगामस्तीच्या, संमेलनातील नाचाच्या खूप साऱ्या गोष्टींबद्दल भरभरून बोललो. पण मला गंमत वाटली की इतक्‍या वर्षानंतरही दुसऱ्या गावात स्मिताने मला अचूक ओळखले होते. खरंच माणसाची “ओळख’ ही अशी असते.

लहानपणापासून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अनेक व्यक्ती येतात. त्या प्रत्येकाची ओळख त्याच्या स्वभाव वैशिष्ट्याप्रमाणे किंवा कधी कधी त्याच्या बाह्य रंगरुपावरूनही मनात राहते. आता सारखं सोशल मीडिया वर्क आपल्या वेळी नव्हतं. त्यामुळे मैत्रिणींना फेसबुक वर भेटणं नसे. तर प्रत्येकीच्या बद्दल मनात तिचं वैशिष्ट्य ठसलेलं असे व तीच तिची ओळख असे. म्हणजे सुनंदा छान गाणं गाते. सुनेत्रा सुंदर रांगोळ्या काढते, अमिता खूप छान दिसते. कविता थोडी जाड आहे, ती उंच गोरी ती सविता इ.इ. असं प्रत्येक व्यक्तीच्या गुण वैशिष्ट्यानुसार आपल्या प्रत्येकाच्या मनात आपल्याला भेटलेल्या व्यक्तींच्या प्रतिमा तयार झालेल्या असतात व त्यानुसारच ती व्यक्तीची “ओळख’ ठसलेली असते.
प्रत्येक व्यक्ती हा एक स्वतंत्र विषय आहे. जसे बाह्य रंगरूप आहे तशी प्रत्येकाची स्वभाव नैशिष्ट्येही वेगवेगळी आहेत. बाह्य रंगरुपाबद्दल आपण काही करू शकत नाही. पण गुणांची जोपासना नक्कीच करू शकतो. आपली “ओळख’ ही आपण आपल्या कर्तृत्वाने, आपल्या चांगल्या वागण्याने, सहृदयतेने नक्कीच बदलू शकतो. आपली प्रतिमा ही लोकांच्या दृष्टीने नक्कीच नेहमी चांगली राहावी, त्यांना आपल्याबद्दल विश्‍वास वाटावा असे चित्र आपण निर्माण करू शकतो.

माणसाची “ओळख’ ही फक्त त्याच्या नावा, आडनावापुरती, गावापुरती, नसावी. आपल्याला माणसांनी ओळखावं ते एक चांगली व्यक्ती म्हणून. सद्‌गुणांची जोपासना, कर्तव्यपूर्ती, प्रेमभाव, ज्येष्ठ व्यक्तींबद्दल आदरभाव, अडचणीच्या काळात कुणालाही मदत करण्याची वृत्ती, मधुर वाणी, आणि स्वतःचा फायदा न बघणारी व्यक्ती सर्वांनाच आवडते. द्वेष, मत्सर, लोभ, राग या दुष्ट प्रवृत्तींपासून लांब राहणेच श्रेयस्कर असते. या जोडीलाच मनात भक्तीभाव, ईश्‍वराप्रती प्रेम असेल तर व्यक्तींच्या जीवनाला वेगळाच अर्थ प्राप्त होतो.तेव्हा आपली “ओळख’ आपणच ठरवू या आणि अमुक एक प्रतिथयश व्यक्ती होण्यापेक्षा आपलं “माणूसपण’ जपणारी माणसं होऊ यात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)