ओबेसिटीमुळे निर्माण होतात समस्या

अतिरिक्‍त वजन हे कुणासाठीही वाईटच! लठ्ठपणामुळे शरीरात असणाऱ्या
हार्मोन्सचं संतुलन बिघडतं. शरीरातील मेदाच्या साठ्यामुळे हार्मोन्सच्या पातळीत बदल होतात. परिणामी, गर्भधारणेची प्रक्रिया अवघड होते. स्त्रियांमधील लठ्ठपणामुळे त्यांच्या जननसंस्थेच्या आरोग्यावर होणारा परिणाम चिंताजनक असतो. वाढलेलं वजन गर्भधारणेत आणि प्रसूतीनंतरही अडचण निर्माण करू शकतं. तसंच पुरुषांमध्ये असलेला लठ्ठपणा अनेक प्रश्‍न निर्माण करतो. त्यात शारीरिक, मानसिक आणि भावनिक प्रश्‍नांचाही समावेश आहे. शरीरातील अतिरिक्‍त चरबीचा अत्यावश्‍यक असणाऱ्या हार्मोन्सच्या निर्मितीशी थेट संबंध असतो. या हार्मोन्सच्या अनियमिततेमुळे पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन आणि शुक्राणूंचं प्रमाण कमी होतं तर स्त्रियांमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरीज सिंड्रोम (पीसीओज) हा आजार उद्‌भवतो.
अलीकडेच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार बॉडी-मास इंडेक्‍स (बीएमआय)चं अतिरिक्‍त प्रमाण असलेल्या स्त्री-पुरुषांमधे प्रजननक्षमता नष्ट होण्याचं प्रमाण सर्वसाधारण वजनाच्या लोकांपेक्षा जास्त असतं, तर प्रजननक्षमता नष्ट झालेल्या 70 टक्‍के स्त्रिया लठ्ठपणालाही बळी पडलेल्या असतात, असं अहवाल सांगतो. या माहितीनुसार पुरुषांचं वजन नऊ किलोग्रॅमने वाढल्यास त्यांच्यातील प्रजननक्षमतेचा ऱ्हास किमान 10 टक्‍के होतो. लठ्ठ माणसांमध्ये शुक्राणूंचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे गर्भधारणेची शक्‍यताही कमी होते.
प्रजननक्षमतेचा -हास होण्यामागे विविध कारणं असली तरी शरीराचं वाढलेलं वजन हा एक महत्त्वाचा घटक आहे. जवळपास सर्वच हार्मोन्सच्या अनियमिततेचं कारण लठ्ठपणा असल्याचं समजलं जातं. लठ्ठपणामुळे गर्भधारणेचं प्रमाण कमी होतंच त्याचबरोबर कामेच्छाही कमी होते. शरीरातील अतिरिक्‍त चरबीमुळे शरीरसंबंधावर परिणाम होत असतो. गर्भधारणा होत नसल्यास लठ्ठ स्त्रियांनी वाढलेलं वजन कमी केल्यास गर्भधारणा सहज शक्‍य होते.
प्रजननक्षमता नष्ट होण्याची लक्षणं
गरज नसताना केसांची वाढ
मानेच्या वळ्यांमध्ये काळे डाग वाढणे (अकॅंन्थोसिस)
याशिवाय गर्भधारणेच्या काळात तात्पुरता मधुमेह होण्याचं प्रमाणही खूप वाढतं. विशेषत: हे प्रमाण लठ्ठपणा आणि मधुमेहाची आनुवंशिकता असेल तर जास्त असतं.
लठ्ठपणा आणि गर्भधारणेवरील परिणाम…
शरीराचं वजन आणि अतिरिक्‍त चरबी किंवा मेद वितरण या गोष्टींचा परिणाम स्त्रियांच्या गर्भधारणेवर होत असतो. लठ्ठ वजनाच्या स्त्रियांमधील गर्भाशयाची यंत्रणा बिघडते आणि बीजधारणेवर परिणाम होतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये मासिक पाळीच्याही समस्या दिसून येतात.
पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस)सारख्या आजारांमध्ये शरीरातील हार्मोन्स अनियमित होतात. त्यामुळे गर्भाशयावर छोटी पुटं निर्माण होऊन गर्भधारणा होण्यास अडचणी निर्माण होतात. तसंच गर्भधारणेची शक्‍यता कमी होते.
पुरुषांमधील प्रजननक्षमतेचा ऱ्हास
पुरुषांमधील लठ्ठपणामुळे टेस्टिक्‍युलर यंत्रणेचा ऱ्हास होतो. अतिरिक्त चरबीच्या अनियमित वितरणामुळे पुरुषांमधील हार्मोन्सचं रूपांतर स्त्रियांमध्ये जास्त असणाया हार्मोन्समध्ये होतं. त्यामुळे पुरुषांच्या छातीच्या भागात चरबीचं प्रमाण तर वाढतंच त्याचबरोबर शुक्राणूंच्या निर्मितीतही घट होते.
गर्भवती स्त्रियांमधील लठ्ठपणा
लठ्ठ स्त्रिया गर्भवती असताना पुढील समस्या निर्माण होतात.
गर्भपात : अनेक लठ्ठ स्त्रिया गर्भवती राहिल्या तरी सुरुवातीच्या काळातील गर्भधारणा पूर्ण होण्यास अडचणी निर्माण होतात. तसंच रक्‍तदाब वाढतो परिणामी गर्भपात होण्याचीही शक्‍यता अधिक निर्माण होते.
प्रसूतीमधील अडचणी
बाळाचा जन्म होण्याच्या काळातही अतिरिक्‍त वजनामुळे अनेक प्रश्‍न निर्माण होतात. त्यात हृदयविकार, टाइप 2 मधुमेह, लिव्हरची समस्या, नराश्‍य अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे आई आणि मुलाच्या आयुष्याला धोका निर्माण होतो. अनेकदा या लठ्ठ स्त्रियांमध्ये उच्च रक्‍तदाब आणि मधुमेह निर्माण होतो. त्यामुळे प्रसूती नीट होऊ शकत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)