ओपन स्कूलिंगमुळे रात्रशाळा बंद होण्याची चर्चा

पुणे – राज्यात मुक्‍त विद्यालय मंडळाची स्थापना होणार असल्याने आता रात्र शाळा बंद होणार असल्याची चर्चा सध्या शिक्षक व शिक्षणसंस्था चालकांमध्ये सुरु आहे. याबाबत शिक्षण सचिव नंदकुमार यांनीही रात्र शाळा बंद होण्याचे विधान यापुर्वी केल्याने रात्र शाळा शिक्षक व संस्थाचालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गरीब घटकांतील विद्यार्थ्यांना काम करता करता शिकता यावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून राज्यात ठिकठिकाणी रात्र शाळा चालविल्या जात आहेत. मात्र शुक्रवारी शिक्षण विभागाने मुक्‍त विद्यापीठ मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मात्र आता रात्र शाळांची गरज उरणार नसल्याची चर्चा शिक्षकांमध्ये रंगली आहे. यामुळे रात्र शाळेत काम करणारे अनेक शिक्षक व शिक्षण सेवकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
काही शिक्षणतज्ज्ञांच्या मते मुक्‍त विद्यालय मंडळ हे शिक्षण हक्‍क कायद्याच्या नियमातच बसत नाही. जर कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये असे जर कायदा सांगत असेल तर शिक्षण अशा मुक्‍त विद्यालयाच्या माध्यमातूनच शिक्षण विभागाला नेमके साध्य काय करायचे आहे असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. याबाबत रात्र शाळेतील शिक्षक म्हणाले, शासनाने रात्र शाळा शिक्षकांची पूर्णपणे भरती केलेली नाही. त्यामुळे हळूहळू या शाळा बंद करण्याचा प्रकार सुरु असल्याचे दिसत आहे.
याबाबत पूना नाईट हायस्कूल व श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक ट्रस्ट ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य अविनाश ताकवले म्हणाले, मुक्‍त विद्यालयाची संकल्पना फार वेगळी आहे. नियमित विद्यार्थी हे रात्र शाळेतच येतील तर शालाबाह्य विद्यार्थी किंवा ज्यांना अन्य शिक्षण घ्यायचे आहे असे विद्यार्थी हे मुक्‍त विद्यालय मंडळाचा पर्याय स्विकारतील.

रात्र शाळा प्रामुख्याने मुंबई शहरांत आहेत. इतरही शहरांत आहेत; पण खूप थोड्या. रात्र शाळांबरोबर आता ओपन स्कूलचा पर्यायसुद्धा उपलब्ध आहे. या नवीन पर्यायाचा रात्र शाळांवर काही प्रमाणात नक्कीच परिणाम होईल. विद्यार्थी कोणता पर्याय किती प्रमाणात निवडतात त्यावर हे अवलंबून असेल. परंतु कोणतीही शिक्षण व्यवस्था विद्यार्थिकेंद्रित असावी लागते. अशा व्यवस्थेत कोणती गोष्ट कोणाच्या मुळावर येईल असा विचार करणेच चुकीचे आहे. जे उपयोगी असेल ते टिकेल. गरजेनुसार रात्र शाळा मुक्त शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्रे चालवू शकतील.
वसंत काळपांडे, शिक्षणतज्ज्ञ
——————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)