ओढ्यावरील अरुंद पुलामुळे वाहतुकीचा बोजवारा

चिंचवड – काळभोरनगर येथील ओढ्यावरील पुल अरुंद आहे. त्यात त्यावर वाहने थांबविली जातात. त्यातच विरुद्ध दिशेने येणारे वाहन चालक, बेदरकारपणे वाहने हाकणारे युवक यामुळे येथील वाहतुकीचे तीन तेरा झाले आहेत. पुलाला जोडणाऱ्या रस्त्यांवर गतीरोधक बसविण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.

काळभोरनगर परिसरात चाळ परिसर आहे. कष्टकरी, कामगार वर्ग याठिकाणी मोठ्‌या प्रमाणावर राहतो. सुर्योदय कॉम्प्लेस जवळील ओढ्यालगत लघुउद्योग आहेत. महापालिकेची शाळा तसेच प्रतिभा महाविद्यालयात मिळून सुमारे बारा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. औद्योगिक वसाहतीलगतच्या मोहनगर, रामनगर, विद्यानगर, चिंचवड स्टेशन, आनंदनगर, दळवीनगरसह शहरातील विद्यार्थी याठिकाणी येतात. ज्येष्ठ नागरिक लहान मुलांना शाळेत सोडायला येत असतात.

विद्यार्थी वाहतुकीबरोबरच लगतच्या औद्योगिक परिसरात अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. या वाहतुकीसाठी सुर्योदय कॉम्प्लेक्‍स लगतचा अरुंद पूल हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे या पुलावर शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस वाहने, माणसे यांची एकच गर्दी होत असते. ओढ्यावरील पुलालगत डाव्या बाजूला व सरळ रस्ता असल्यामुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहन चालकांना पुलावरुन येणारी वाहने दिसत नाहीत. याठिकाणी कोणतेही सूचना फलक नाहीत. त्यामुळे वेगातील वाहनांची धडक ठरलेली असते. पादचाऱ्यांना जीव धोक्‍यात घालून येथून प्रवास करावा लागतो. रात्रीच्या वेळी या मार्गावरुन वाहतूक धोकादायक बनत चालली आहे. यामध्ये आजपर्यंत अनेक विद्यार्थी, कामगार, ज्येष्ठ नागरिक जखमी झाले आहेत. धडकेचे रुपांतर अनेकदा वादात होते. या ठिकाणी गतीरोधक बसवावेत तसेच वेग मर्यादेचे बंधन घालणारे फलक लावावेत, पुलाची रुंदी वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.

काळभोरनगर व एमआयडीसीला जोडणारा ओढ्यावरील पूल हा एकमेव मार्ग आहे. पूर्वी या मार्गावर रहदारी कमी होती. त्यामुळे फारसा फरक जाणवत नव्हता. मात्र, आता रहदारी वाढली आहे. त्यात पुलावर वाहने उभी केली जातात. पुलावरही “ओव्हरटेक’चा प्रयत्न होतो. परिणामी रहदारीच्या वेळी पुलावर वाहतूक कोंडी होते. यावर कायम स्वरुपी तोडगा काढण्यासाठी पुलाची रुंदी वाढविणे गरजेचे आहे.
– संकेत शिंदे, विद्यार्थी.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)