ओढे, नाल्यांच्या कडेला बांधकाम बंदी उठविली

संग्रहित छायाचित्र...

पुनर्विकासास वाव : राज्य शासनाच्या नियमावलीत सुधारणा

पुणे – शहरातील ओढे आणि नाल्यांच्या कडेला 6 व 15 मीटरच्या परिसरात बांधकामांवर घालण्यात आलेली बंदी अखेर राज्य शासनाने मागे घेतली आहे. महानगरपालिकेचे आयुक्त हे विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीनुसार नाल्यापासूनच्या किमान अंतरामध्ये सवलत देऊ शकणार आहे. त्यामुळे शहरातील अनेक रखडलेल्या बांधकामांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.

-Ads-

पुणे महापालिकेच्या जुन्या हद्दीचा विकास आराखड्यास मान्यता देताना राज्य सरकारने शहरातील ओढ्या आणि नाल्यांच्या कडेने 6 व 15 मीटरच्या परिसरात बंदी घालण्याची तरतूद नव्याने केली होती. त्यामुळे पुणे शहरातील आंबिल ओढा, माणिक नाल्यांपासून अनेक नाल्यांच्या कडेने असलेली बांधकामे अडचणीत आली होती. पुनर्विकासाठी आलेल्या परंतु ओढ्या-नाल्यांच्या कडेने असलेली ही सर्व बांधकामे थांबली होती. यामुळे नाल्यालगतचे छोटे प्लॉटधारक तसेच लहान घरांचा पुनर्विकास थांबला होता.

बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीत झालेली ही चूक दुरुस्त करण्यासाठी महापालिकेत शहर सुधारणा समिती आणि सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने ठराव मान्य करण्यात आला होता. त्यावर हरकती-सूचना मागवून सर्व अभिप्रायासह महापालिकेकडून हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पडून होता. अखेर राज्य सरकारकडून त्यास शुक्रवारी मान्यता देण्यात आली. शहरातील ओढे-नाल्यांच्या कडेने सहा आणि पंधरा मीटरच्या परिसरात बांधकामांवर असलेली बंदी उठविली आहे. तसेच अशा बांधकामांना परवानगी देताना काही तांत्रिक अडचणी असल्यास त्यास मान्यता देण्याचे अधिकार आयुक्तांना प्रदान केले आहेत. त्यामुळे शहरातील अनेक वाडा मालक आणि जुन्या इमारतींच्या मालकांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)