ओंड येथील भोंदूबाबाचा पर्दाफाश

अंनिस, सातारा व कराड पोलिसांची संयुक्तिक कारवाई

कराड दि. 9 (प्रतिनिधी) – दैवी शक्ती असल्याचा दावा करत विविध कारणांनी लोकांची फसवणूक करणार्‍या भोंदूबाबाचा पोलिसांनी पर्दापाश केला आहे. ओंड येथील शंकर भिमराव परदेशी (वय 55) असे या भोंदू बाबाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीवरून अंधश्रद्धा निर्मुलन समिती सातारा, स्थानिक गुन्हे अन्वेषण सातारा व कराड पोलीस यांनी सापळा रचून संयुक्तिकरित्या ही कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हा भोंदूबाबा स्वत:च्या घरात देवीचा दरबार भरवून लोकांना मुलगा होणे, नोकरी लावणे, घरगुती अडचण दूर करणे, कामधंदा मिळवून देणे, जमिनीचा वाद मिटवणे यावर उपाय सांगतो असे सांगून लोकांची फसवणूक करणार्‍या भोंदूबाबाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. सुनील विश्वास काळे रा. चरण ता. शाहुवाडी जि. कोल्हापूर हा कामधंदा मिळण्यासाठी व घरातील अडचण दूर होण्यासाठी 2-3 महिन्यांपासून या बाबाकडे येत होता. बाबाने त्याला देवाचे भागवण्यासाठी 10 हजार रुपये खर्च असल्याचे सांगितल्यानुसार सुनील काळे याने दोन महिन्यांपूर्वी सदर रक्कम व्याजाने घेऊन बाबाकडे सुपूर्द केली. मात्र, बाबाच्या उपायाचा याला कोणताही फायदा न झाल्याने सुनील काळे याने बाबाच्या विरोधात सातारा येथील अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडे लेखी अर्ज दिला. त्याअनुशंघाने अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सदर घटनेची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा साताराचे पोनि. पद्माकर घनवट यांना दिली. त्यानुसार रविवार दि. 9 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक सपोनि विकास जाधव यांच्यासह कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांचे पथक, सोबत तक्रारदार व पंचांना घेवून भोंदूबाबाच्या घराजवळ सापळा रचून भोंदूबाबा शंकर परदेशी याला पोलिसांनी ताब्यात घेतले. बाबाकडून देवार्यातील 39 हजार 305 रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने, पोशाख, जादू टोण्याचे साहित्य असा एकूण 72 हजार 952 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. मुळ कर्नाटकातील असणारा हा भोंदूबाबा सुमारे 15 ते 20 वर्षापासून लोकांची फसवणूक करत असून तो लोकांना लाखो रुपयांचा गंडा घालत असल्याचे समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई सातारा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोनि. पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विकास जाधव, सहा.पो.फौ. विजय जाधव, पृथ्वीराज घोरपडे, पो.ना. प्रमोद सावंत, पो.कॉ. निलेश काटकर, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन,यांनी कारवाईत सहभाग घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)