ऑस्ट्रेलियन खेळाडू मला लादेन म्हणाले : मोईन अली

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीचा दावा

लंडन: ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे वर्तन मैदानात चांगले नसते, या गोष्टीचा प्रत्यय मला 2015 मध्ये झालेल्या ऍशेस मालिकेच्या पहिल्याच सामन्यात आला होता. माझ्यावर दबाव आणण्यासाठी सुरुवातीला त्यांनी टोमणे मारायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मला चक्‍क शिवीगाळही केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांच्यातील एकाने मला ओसामा बिन लादेन अशी हाक मारताना शेरेबाजीचा कळस केला, असा खळबळजनक आरोप इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने केला आहे.

इतके सारे घडूनही मी मैदानात त्यांना एकाही शब्दाने उत्तर दिले नाही. कारण त्यांची कृती असमर्थनीय आणि क्रिकेटच्या नियमांच्या विरुद्ध होती. मीही तसेच वागणे उचित ठरले नसते, असेही मोईनने म्हटले आहे. नुकत्याच पार पडलेल्या भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या मोईन अलीने केलेल्या या आरोपामुळे क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिली आहे. 2015 ऍशेस मालिकेतील कार्डिफ कसोटीत मोईन अलीने 77 धावा करताना 5 बळीही घेत अष्टपैलू कामगिरी बजावली होती.

या ऍशेस मालिकेदरम्यान पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आपल्या विरोधात वर्णद्वेषी टिप्पणी केली होती. तसेच 2017 च्या ऍशेल मालिकेतही आपल्याबाबत पुन्हा असाच प्रकार घडल्याचे मोईन अलीने म्हटले आहे. 31 वर्षीय मोईन अली आपलं आत्मचरित्र प्रकाशित करण्याच्या तयारीत आहे. या महिन्याच्या अखेरीस मोईन अलीचे हे आत्मचरित्र वाचकांच्या हाती मिळणार आहे. या आत्मचरित्रात अलीने आपल्याला सहन करावे लागलेले वर्णद्वेषी टिप्पणीचे प्रसंग नमूद केले आहेत.

टेलिग्राफ वृत्तपत्राशी बोलताना मोईन अली म्हणाला की, 2015ची ऍशेस मालिका ही माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती. इतर खेळाडूंप्रमाणे माझी कामगिरीही या मालिकेत उल्लेखनीय झाली होती. मात्र एका प्रसंगामुळे माझे खेळावरचे लक्ष विचलित झाले. एका ऑस्ट्रेलियन खेळाडूने मला ओसामा म्हणून हिणवले. पहिल्यांदा मी जे ऐकतोय त्याच्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी पहिल्यांदाच कोणावर तरी इतका रागावलो होतो, असे सांगून मोईन पुढे म्हणाला की, ऑस्ट्रेलियन संघात कोणताही खेळाडू “जंटलमन’ नाही हे त्या प्रसंगावरून मला जाणवले होते.

यानंतर हा प्रसंग मी माझ्या सहकाऱ्यांना आणि प्रशिक्षकांना सांगितला. प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांनी ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांच्याकडे याविषयी विचारणा केली. लेहमन यांनी ऑस्ट्रेलियाच्या संघातील खेळाडूंना विचारले असता, त्या खेळाडूने आपण असं काही बोललोच नसल्याचे सांगून मी केवळ त्याला बदली खेळाडू म्हणून संबोधले, असे म्हणत माझ्या आरोपांचे खंडन केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने त्या प्रकरणी पुढे काहीही कारवाई केली नाही, असेही मोईनने सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)